एक्स्प्लोर
घरातून फाईल्स क्लिअर, पर्रिकर पुढील उपचारांसाठी अमेरिकेला जाणार?
लीलावती रुग्णालयातून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पर्रिकर पुढील उपचारासाठी अमेरिकेत जाण्याची शक्यता आहे.

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर स्वादूपिंडाच्या विकारावरील उपचारासाठी आज पुन्हा मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. लीलावती रुग्णालयातून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पर्रिकर पुढील उपचारासाठी अमेरिकेत जाण्याची शक्यता आहे. गोमेकॉ रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, पर्रिरकरांनी घरातूनच कामाला सुरुवात केली. त्यांनी महत्त्वाच्या फाईल्स घरातून क्लिअर केल्या. आज पर्रिकर मुंबईला रवाना होण्यापूर्वी प्रशासकीय कामे हातावेगळी करणार असून, भाजपच्या आमदारांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. आपल्या गैरहजेरीत कोणतीही कामे अडू नयेत यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मंत्र्याला 50 लाखांप्रयत्न निधी खर्च करण्याची परवानगी दिली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पर्रिकरांना 15 फेब्रुवारीला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. फूड पॉयझनिंगच्या त्रासानंतर पोटात दुखू लागल्याने, प्रथमत: त्यांच्यावर गोव्यातील बांबोळी येथील गोमेकॉमध्ये उपचार करण्यात आले. मात्र अधिकच्या उपचारासाठी त्यांना मुंबईत आणण्यात आलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत 3 मंत्र्यांचा गट कार्यभार सांभाळणार मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे उपचारासाठी जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये राहिले, तर काम कोण पाहणार, असा प्रश्न होता, त्याचं उत्तर आता मिळालं आहे. मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या गैरहजेरीत प्रशासकीय कामे खोळंबू नयेत, यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई आणि नगर विकासमंत्री फ्रांसिस डिसोझा या 3 वरिष्ठ मंत्र्यांच्या गटाकडे सर्वाधिकार सोपवण्यात आल्याचे वृत्त आहे. या गटाल 5 कोटी रुपयांपर्यंतची कामे मंजूर करण्याचे अधिकार देण्यात आले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. संबंधित बातम्या






















