Goa Assembly Election 2022: गोव्यात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या गोव्यात असून, यादरम्यान त्यांनी आज वेल्सावमध्ये मच्छिमारांची भेट घेतली. या भेटीत राहुल यांनी मच्छिमार समाजातील अनेक सदस्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.


बैठकीत ते म्हणाले की, यूपीए सरकार सत्तेवर असताना पेट्रोलची आंतरराष्ट्रीय किंमत प्रति बॅरल 140 डॉलरवर पोहोचली होती. आज पेट्रोल आणि डिझेलच्या आंतरराष्ट्रीय किमती आम्ही सत्तेत होतो त्यापेक्षा खूप कमी आहेत. पण, तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलसाठी खूप पैसे मोजावे लागत आहे.




राहुल त्यांच्या भाषणादरम्यान पुढे म्हणतात, "आम्ही निवडणुकीपूर्वी छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते आणि आम्ही ते वचन पूर्ण केले आहे. तुम्ही पंजाब, कर्नाटकात जाऊनही याची पुष्टी करू शकता. आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे काही म्हणतो ती हमी आहे, आश्वासन नाही."


राज्याच्या पर्यावरणाविषयी बोलताना ते म्हणाले की, गोव्यात पर्यावरण ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि तिचे संरक्षण कोणत्याही किंमतीत केले पाहिजे, म्हणून आम्ही स्पष्ट आहोत की आम्ही गोव्याला कोळसा हब होऊ देणार नाही, आम्ही राज्याला प्रदूषित होऊ देणार नाही. राहुल गांधी यांनी उपस्थित लोकांना आवाहन केलं की त्यांनी मला कुटुंबातील सदस्यप्रमाणे समजावे. राहुल म्हणाले की, राज्याशी संबंधित सर्व समस्या मला सांगा म्हणजे मला तुमच्या समस्या काय आहेत हे कळेल.