Coronavirus Cases Today : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्याप सुरुच आहे. देशात दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा घटला असला तरी, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या मात्र अधिक आहे. गेल्या 24 तासांत 14 हजार 313 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 549 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत देशात एकूण 4 लाख 57 हजार 740 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशातील कोरोनाची एकूण आकडेवारी
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 13 हजार 543 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या एक लाख 61 हजार 555 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. देशात आतापर्यंत 3 कोटी 42 लाख 60 हजार 470 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 36 लाख 41 हजार 175 रुग्ण कोरोनामुक्त झाली आहे.
राज्यात काल (शुक्रवारी) 1338 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 36 जणांचा मृत्यू
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात काल (शुक्रवारी) 1338 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 584 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 47 हजार 038 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.55 टक्के आहे.
राज्यात काल (शुक्रवारी) 36 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 3759 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (16), नंदूरबार (1), धुळे (6), जालना (20), लातूर(68), परभणी (34), हिंगोली (19), नांदेड (25), अकोला (21), अमरावती (18), वाशिम (03), अकोला (21), बुलढाणा (05), नागपूर (65), यवतमाळ (06), वर्धा (6), भंडारा (3), गोंदिया (2), चंद्रपूर (15) गडचिरोली (2 ) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
राज्यात सध्या 18 हजार 465 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1,68,338व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 908 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 24 , 39, 900 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 335 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 335 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 312 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,32,426 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात सहा रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4131 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1462 दिवसांवर गेला आहे.