मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. गेल्या 50 वर्षांपासून काँग्रेससोबत असलेलं नातं आपण तोडत आहोत असं त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. देशाच्या राजकारणात नेहमी अग्रस्थानी असलेल्या गुलाम नबी आझाद यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ही महाराष्ट्रातून झाली. वाशिम लोकसभा मतदारसंघातून त्यांनी आपल्या संसदीय कारकीर्दीची सुरुवात केली. 


काश्मीरच्या युवक काँग्रेसचे अध्यक्ष 


गुलाम नबी आझाद यांची 1973 साली जम्मू काश्मीरमधील भालेसा ब्लॉक काँग्रेसच्या प्रमुखपदी निवड झाली. त्यानंतर त्यांची जम्मू काश्मीर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. 1980 मध्ये त्यांची ऑल इंडिया युथ काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. 


वाशिम लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार


गुलाम नबी आझाद यांची राजकीय कारकीर्द जम्मू-काश्मीरमधून सुरु झाली असली तरी त्यांच्या देशपातळीवरील राजकारणाची सुरुवात महाराष्ट्रातून झाली. मूळचे काश्मीरचे असणारे गुलाम नबी आझाद वाशिम लोकसभा मतदार संघातून 1980 साली पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून गेले. 1982 साली त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात उपमंत्री म्हणून वर्णी लागली. वाशिम मतदारसंघातून ते 1984 सालच्या लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा संसदेत निवडून गेले. 


महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवड


महाराष्ट्रातून दोनदा लोकसभेवर गेल्यांनंतर गुलाम नबी आझाद हे राज्यसभेवरही महाराष्ट्रातूनच गेले. 1990 ते 1996 या दरम्यान ते महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेले. त्यानंतर 1996 ते 2002 या दरम्यान ते काश्मीरमधून राज्यसभेवर गेले. तसेच 2002 सालीही ते राज्यसभेवर निवडून गेले होते. 


जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री


गुलाम नबी आझाद हे काँग्रेस पक्षाकडून 2005 साली जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी त्यांची वर्णी लागल्यानंतर त्यांनी आपल्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. 


केंद्रीय मंत्री म्हणून काम


डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात काँग्रेसचं सरकार आल्यानंतर त्यामध्ये गुलाम नबी आझाद यांची केंद्रीय आरोग्यमंत्री पदावर निवड करण्यात आली. 2014 साली केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर गुलाम नबी आझाद यांची राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर निवड झाली. 2015 साली त्यांची पुन्हा राज्यसभेवर निवड करण्यात आली. गुलाम नबी आझाद यांचा 2002 साली पद्मभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. 


गुलाब नबी आझाद हे काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्य होते. तसेच ते काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय होते. ऑगस्ट 2020 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमधील 23 जेष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून काँग्रेसमध्ये काही बदल करायला हवा अशी सूचना केली होती. राहुल गांधींनी एकतर जबाबदारी घ्यावी किंवा मग काही काळ बाजूला तरी राहावं अशी या जी 23 गटाच्या नेत्यांची भूमिका होती. 


गुलाम नबी आझाद यांनी आता काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपली भविष्यातील राजकीय दिशा अद्याप स्पष्ट केली नाही.