Supreme Court Live Stream : भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा (Chief Justice NV Ramana) आज म्हणजेच, 26 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत. अशातच CJI NV रमण्णा यांच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या खंडपीठासमोर सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) कामकाजाचं लाईव्ह स्ट्रिमिंग (Live Streamed) केलं जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, 2018च्या निकालानंतर पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात लाईव्ह स्ट्रिमिंग केलं जाणार आहे.
दरम्यान, सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा, आज म्हणजेच, 26 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांची 17 फेब्रुवारी 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाली होती. त्यांनी देशाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ गेल्यावर्षी म्हणजेच, 24 एप्रिल 2021 रोजी घेतली होती. रमण्णा यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती उदय लळीत (Justice Uday Lalit) 27 ऑगस्ट रोजी देशाचे 49 वे सरन्यायाधीश या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
रमण्णा देशाच्या पुढच्या सरन्यायाधीशांसोबत बेंच शेअर करतील
परंपरेनुसार, एन. व्ही. रमण्णा त्यांच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी देशाच्या पुढील सरन्यायाधीशांसोबत बेंच शेअर करतील. रमण्णा यांच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी औपचारिक खंडपीठासमोर त्यांचा निरोप समारंभ पार पडेल. आज CJI रमण्णा CJI नियुक्त न्यायमूर्ती UU ललित यांच्यासोबत बेंच शेअर करतील.
सर्वोच्च न्यायालयाच्या कम्प्युटर सेलनं दिली लाईव्ह स्ट्रीमची माहिती
सर्वोच्च न्यायालयाच्या कम्प्युटर सेलद्वारे जारी करण्यात आलेल्या नोटिशीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, "माननीय सरन्यायाधीशांच्या न्यायालयाची कार्यवाही, म्हणजेच समारंभ खंडपीठ NIC च्या माध्यमातून वेब पोर्टलद्वारे 26 ऑगस्ट 2022 पासून सकाळी 10:30 AM पासून थेट प्रक्षेपित केली जाईल."
तुम्ही माझ्याकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न केलाय : CJI एन. व्ही. रमण्णा
दिल्ली हायकोर्ट बार असोसिएशननं आयोजित केलेल्या निरोपाच्या कार्यक्रमात मावळते सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा म्हणाले की, "मला वाटतंय की, तुम्ही माझ्याकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न केला आहे. मी मुख्य न्यायाधीश म्हणून माझं कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. मी दोन मुद्दे उपस्थित केले, ते तुम्हा सर्वांना माहीत आहेच. एक म्हणजे, पायाभूत सुविधा आणि दुसरा म्हणजे, न्यायाधीशांची नियुक्ती. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि कॉलेजियम यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. आम्ही उच्च न्यायालयांमध्ये सुमारे 224 न्यायाधीशांची यशस्वीपणे नियुक्ती केली आहे."