लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये गँगरेप पीडितेच्या वडिलांचा पोलिस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानासमोर कालच बलात्कार पीडितेने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पीडितेचे वडील सुरेंद्र (पप्पू) सिंह यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला.


भाजपचे उन्नावमधील आमदार कुलदीप सिंह सेंगर आणि त्यांच्या भावाने बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

खटला मागे न घेतल्यामुळे 3 एप्रिल रोजी आमदाराच्या भावाने पीडितेच्या वडिलांना बेदम मारहाण केली होती. गंभीर जखमी झालेल्या सुरेंद्र सिंह यांच्यावरच गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्यांना तुरुंगात पाठवलं. मात्र जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी सुरेंद्र सिंह यांना मृत घोषित करण्यात आलं.

आमदाराच्या भावाने केलेल्या मारहाणीत सुरेंद्र सिंह यांचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. आमदाराच्या दबावामुळे वर्षभरापासून पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

न्याय न मिळाल्यामुळे काल पीडितेचं कुटुंब योगी आदित्यनाथ यांच्या घरासमोर आत्मदहन करण्यासाठी गेलं होतं. त्यानंतर बलात्कार पीडितेने आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.