अलाहाबाद : पंतप्रधान मोदींनी सत्तेत आल्यानंतर गंगा स्वच्छतेचं आश्वासन देत त्यासाठी वेगळ्या मंत्रालयाची निर्मितीही केली होती. मात्र कालपासून अलाहाबादमध्ये सुरु असलेल्या माघ यात्रेदरम्यान प्रदुषित झालेल्या गंगेच्या स्वच्छतेसाठी स्थानिक मुस्लिमांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे गंगा नदी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.


अलाहाबादमधील स्थानिक मुस्लिमांनी फक्त गंगा नदीची स्वच्छताच केली नाही, तर गंगा नदीतील प्रदुषण संपावं यासाठी हात पसरुन प्रार्थनाही केली. गंगा नदी फक्त हिंदूसाठीच श्रद्धास्थान नाही तर मुस्लिमांच्या मनातही गंगेबद्दल श्रद्धा आहे. अलाहाबादमध्ये पिण्यासाठी गंगेचं पाणीच वापरलं जातं. माघ यात्रेवेळी गंगेमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होतं. यावर तोडगा काढत स्थानिक मुस्लिमांनी गंगेची स्वच्छता हाती घेतली आहे.

गंगेच्या त्रिवेणी संगमासोबतच वेगवेगळ्या घाटावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. गंगेची यापूर्वी परदेशी पाहुण्यांनीही सफाई केली होती. आता स्थानिक मुस्लिमांनी स्वच्छता करुन वेगळाच पायंडा पाडला आहे.