मुंबई : 'वैष्णव जन तो तेने कहिये जे, पीड़ पराई जाने रे' ही उक्ती महात्मा गांधीजी (Mahatma Gandhi) म्हणजे बापूंच्या जीवनाला चपखलपणे लागू होते. सगळ्यात आधी त्यांनी देशातील दुर्बल आणि पीडित लोकांचा विचार केला. म्हणूनच देश ज्यावेळी ब्रिटिशांच्या 150 वर्षांच्या गुलामीतून मुक्त झाला, सगळीकडे आनंद साजरा केला जात असताना बापू मात्र बंगालच्या नौखालीमध्ये धार्मिक दंगली शांत करण्यासाठी झटत होते. 'माझं जीवन हाच माझा संदेश' असल्याचं सांगणाऱ्या बापूंनी आपल्या लहान-सहान कृतीतून अनेक मोठमोठ्या समस्यांवर उपाय शोधले. धोरणकर्त्यांना कोणत्याही धोरणाची निर्मिती करताना मनात काही शंका आली तर त्यांनी पाहिलेल्या सर्वात गरीब किंवा दुबळ्या व्यक्तीचा चेहरा सामोर आणावा आणि त्याचं भलं करणारं धोरण आखावं असा सोपा मंत्र त्यांनी दिला. हा मंत्र आजच्या आणि भविष्यातील सत्ताधाऱ्यांनाही लागू होतो.


भारत ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त होणार हे आता स्पष्ट झालं होतं. मग देशाचा कारभार भारतीयांच्या हाती सोपवण्याच्या घडामोडींना वेग आला. त्याचाच एक भाग म्हणून भारताची एक स्वतंत्र घटना समिती तयार करण्यात आली. त्यावेळी बाबू जगजीवन राम आणि घटना समितीचे इतर काही सदस्य बापूंचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले.


भेटायला आलेल्या सर्व सदस्यांनी उद्देशून बापू म्हणाले की, "आपण जगातील सर्वात सुंदर संविधान बनवलं तरी त्याची अंमलबजावणी करणारे लोक जर योग्य नसतील तर त्याचा काही उपयोग होणार नाही. आज मी तुम्हाला एक ताविज, मंत्र देणार आहे जे तुम्हाला सर्वात चांगलं संविधान बनवण्यासाठी उपयोगी ठरेल."


बापूंच्या या वाक्याने जगजीवन राम याना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले की, बापू, मला वाटत होतं की आपण कोणत्याही ताविज, मंत्रावर विश्वास ठेवणारे नाही. मग हे काय? त्यावर बापू म्हणाले, पण या मंत्रावर माझा पूर्ण विश्वास आहे.


बापू म्हणाले, "ज्यावेळी तुम्हाला स्वतःला कधी शंकेच्या घेऱ्यात अडकल्याचं वाटेल त्यावेळी एक गोष्ट करा. तुम्ही आतापर्यंत पाहिलेल्या सर्वात दिनदुबळ्या, गरीब, दुर्बल व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणा. त्यावेळी स्वतःला विचारा, जे मी करतोय त्याचा या व्यक्तीला काही फायदा होईल का? त्याच्या जीवनात यामुळे काही फरक पडेल का? जे भुकेने व्याकुळ झालेले आहेत अशा कोट्यवधी लोकांना यामुळे स्वराज्य मिळेल का? मग बघा, तुमच्या मनातील सगळ्या शंका छू मंतर होऊन जातील." 


मंत्र- तंत्र आणि ताविज या कर्मकांडाच्या गोष्टी. गांधीजी कधीही अंधश्रद्धेच्या मार्गाने गेले नाहीत, कर्मकांडावर त्यांचा विश्वास नव्हता. पण गांधीजींनी सांगितलेला हा मंत्र किती सोपा आणि साधा आहे. धोरणकर्त्यांनी हा मंत्र जर अमलात आणला तर देशासमोरच्या, जगासमोरच्या अनेक समस्या गायब होतील. हीच आहे गांधी विचारांची आजची समर्पकता.