मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोबर रोजी जयंती. त्यानिमित्ताने देशभर गांधीजींचं स्मरण केलं जातंय. महात्मा गांधी यांनी सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. महात्मा गांधी यांची ख्याती एवढी होती की त्यांच्यावर आणि त्यांच्या विचारावर जगभरात अनेक सिनेमे आले. भारतातही अनेक चित्रपटांवर गांधी या नावाचं गारुड आहे. 


महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटांमध्ये अनेक अभिनेत्यांनी अभिनय केला. आपल्या अभिनयाच्या माध्यमातून पडद्यावर गांधी साकारण्याचा पुरेपूर प्रयत्न त्यांनी केला. त्यापैकी काही अभिनेत्यांची आणि चित्रपटांची माहिती आपण घेऊया, 


जे एस कश्यप 


जे एस कश्यप (JS Cashhyap) यांनी 1963 सालच्या 'नाईन अवर्स टू रामा' (Nine Hours to Rama) या चित्रपटामध्ये महात्मा गांधींची भूमिका केली. नथूराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या करण्यापूर्वीचे नऊ तास कसे होते, त्या वेळी काय काय घडलं हे या चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे. 


बेन किग्जले 


रिचर्ड अटेनबरो यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि 1982 साली प्रदर्शित झालेल्या 'गांधी' (Gandhi) या जगप्रसिद्ध चित्रपटामध्ये गांधींजींची भूमिका ही बेन किंग्जले (Ben Kingsley) यांनी केली होती. ही भूमिका प्रचंड गाजली असून त्यांना त्यासाठी पुरस्कारही मिळाला आहे. 


अनू कपूर  


सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आयुष्यावर आधारित असलेला 1993 सालचा सिनेमा 'सरदार' (Sardar) मध्ये अनू कपूर (Annu Kapoor) यांनी महात्मा गांधींची भूमिका साकारली होती. परेश रावल यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका साकारली होती.


रजित कपूर 


द मेकिंग ऑफ महात्मा (The Making of the Mahatma) या 1996 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात रजित कपूर (Rajit Kapur) यांनी महात्मा गांधींची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी रजित कपूर यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. 


दर्शन जरिवाला 


'गांधी, माय फादर' या 2007 सालच्या चित्रपटामध्ये दर्शन जारिवाला (Darshan Jariwala) यांनी महात्मा गांधींची भूमिका साकारली होती. हा चित्रपट गांधीजींचा पुत्र हरिलाल यांच्या जीवनावर आधारित असून हरिलाल यांची भूमिका अक्षय खन्ना याने साकारली होती. अनिल कपूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. 


नसरुद्दीन शाह 


बॉलिवूडचे प्रख्यात अभिनेते नसरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी 'हे राम' (Hey Ram) या 2000 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये महात्मा गांधीजींची भूमिका साकारली होती. भारत पाकिस्तान फाळणी आणि नथूराम गोडसेने केलेली गांधीजींची हत्या यावर हा चित्रपट आधारित होता. 


दिलीप प्रभावळकर 


'लगे रहो मुन्नाभाई' (Lage Raho Munna Bhai) हा अलिकडच्या काळातील सर्वात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट. गांधीजी आणि गांधीगिरी या संकल्पनेवर आधारित या चित्रपटात मराठी अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांनी गांधीजींची भूमिका साकारली होती. 2006 साली आलेल्या या चित्रपटामध्ये संजय दत्तने प्रमुख भूमिका बजावली होती.