Gaganyaan Mission Test Flight Today: इस्रोच्या (Indian Space Research Organisation) गगनयान मोहिमेअंतर्गत (Gaganyaan Mission) आज पहिलं चाचणी उड्डाण प्रक्षेपित केलं जाणार आहे. गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळवीरांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे चाचणी उड्डाण करण्यात येणार आहे. ही चाचणी आज सकाळी आठ वाजता श्रीहरीकोटा (Sriharikota) इथे पार पडेल. या चाचणी दरम्यान मॉड्यूल अंतराळात नेलं जाईल. त्यानंतर ते ठराविक उंचीपर्यंत नेऊन पुन्हा पृथ्वीवर परत आणून बंगालच्या उपसागरात उतरवले जाईल. इस्रोकडून या उड्डाण चाचणीला अबॉर्ट टेस्ट असं नाव देण्यात आलं आहे.


इस्रोसाठी आजचा दिवस खूप खास आहे. गगनयान मोहिमेची पहिली मोठी चाचणी आज आहे. गगनयान मोहीम यशस्वी करण्यासाठी इस्रोचे शास्त्रज्ञ पूर्ण तयारी करत आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) भारताच्या गगनयान मोहिमेच्या प्रक्षेपणाच्या दिशेनं क्रू एस्केप सिस्टम (CES) चं पहिलं चाचणी उड्डाण करणार आहे. शनिवारी गगनयान मोहिमेदरम्यान, रॉकेटमध्ये बिघाड झाल्यास अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर आणणारी क्रू एस्केप सिस्टम (Crew Escape System) चाचणी केली जाईल. अशा मोहिमेतील अंतराळवीरांच्या सुरक्षेसाठी ही चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात क्रू एस्केप सिस्टम म्हणजे नक्की काय?






क्रू एस्केप सिस्टम टेस्टिंग म्हणजे नेमकं काय?


सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर, मोहिमेदरम्यान काही चूक झाली, तर भारतीय अवकाशातील अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर कसं आणलं जाईल? त्याची चाचणी आज होणार आहे. भारतीय अंतराळ संस्था इस्रो गगनयान मोहिमेच्या क्रू एस्केप सिस्टमची चाचणी घेणार आहे. यासाठी पहिली मोठी चाचणी होणार आहे. या चाचणीमध्ये रॉकेटमध्ये काही बिघाड झाल्यास अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर आणणाऱ्या यंत्रणेची चाचणी घेतली जाणार आहे. यामध्ये श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून टेस्ट व्हेईकल अॅबॉर्ट मिशन टीव्ही-डी1 लाँच करण्यात येणार आहे. या फ्लाईटचे तीन भाग असतील - सिंगल स्टेज लिक्विड रॉकेट, क्रू मॉड्यूल आणि क्रू एस्केप सिस्टम.


एखाद्या क्षणी मिशन अबॉर्टसारखी परिस्थिती निर्माण केली जाईल


क्रू एस्केप सिस्टम म्हणजे, अंतराळवीराला रॉकेटपासून दूर नेणं. टेस्ट व्हेइकल त्याच्या चाचणीसाठी सज्ज आहे, जे सिंगल फेज रॉकेट आहे. ते गगनयानाच्या आकाराचं आणि वजनाचंच आहे. यात गगनयानासारखीच सर्व यंत्रणा असेल. टेस्ट व्हेइकल अंतराळवीरांसाठी तयार केलेले क्रू मॉड्यूल स्वतःसोबत घेईल. त्यानंतर 17 किलोमीटर उंचीवर कोणत्याही एका बिंदूवर मिशन अबॉर्टसारखी परिस्थिती निर्माण केली जाईल आणि क्रू एस्केप सिस्टम रॉकेटपासून विभक्त होईल. यावेळी क्रू एस्केप सिस्टीम योग्य प्रकारे काम करतेय की नाही? याची चाचणी केली जाईल. यात पॅराशूट बसवले जातील, ज्याच्या मदतीनं ही यंत्रणा श्रीहरिकोटाच्या किनार्‍यापासून 10 किलोमीटर अंतरावर बंगालच्या उपसागरात उतरेल. भारतीय नौदलाचं जहाज आणि डायव्हिंग टीमच्या मदतीनं ते बाहेर काढलं जाईल.


या मोहिमेवर नौदलाचीही नजर 


या मोहिमेसाठी इस्रो चार अंतराळवीरांना प्रशिक्षण देत आहे. बंगळुरूमध्ये स्थापन करण्यात आलेल्या अंतराळवीर प्रशिक्षण सुविधेत वर्ग प्रशिक्षण, शारीरिक फिटनेस प्रशिक्षण, सिम्युलेटर प्रशिक्षण आणि फ्लाइट सूट प्रशिक्षण यांचा समावेश आहे. TV-D1 क्रू मॉड्युलच्या सागरी रिकव्हरीचं काम नौदलाला देण्यात आलं आहे. क्रू मॉड्युल रॉकेट टेक ऑफ झाल्यानंतर 531.8 सेकंदात लॉन्च पॅडपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर पडेल. रिकव्हरी शिप क्रू मॉड्युलकडे जाईल आणि पाणबुडे ते रिकव्हरी करतील. भारतीय नौदलाकडून रिकव्हर होईपर्यंत ते तरंगत राहील.