नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात राज्य आणि केंद्र सरकार अशा नेतृत्वाची 20 वर्षे पूर्ण केली. आजच्याच दिवशी 20 वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी 2001 साली गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. गुजरातसाठी ते वर्ष फार कठिण होतं. त्याच वर्षी गुजरातमध्ये भूकंप झाला होता. गुजरातमध्ये भूकंपानं मोठं नुकसान झालं होतं. मात्र तशा परिस्थितीत राज्याची धुरा हाती घेतलेल्या नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या विकासाचं जबरदस्त मॉडेल बनवलं.


गुजरातमध्ये मोदी यांचं कार्य पाहून त्यांचं नेतृत्व देशपातळीवर आणलं जावं अशी मागणी भाजपमधून केली जाऊ लागली. 2013 साली भाजपनं नरेंद्र मोदी यांचं नाव पंतप्रधान पदासाठी जाहीर केलं.  2014 लोकसभा निवडणुकीत भाजपनं मोठा विजय मिळवला आणि पूर्ण बहुमतासह सत्तेत आले आणि नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्यानंतर 2019 मध्ये देखील भाजप 2014 पेक्षा अधिक जागा जिंकत सत्तेत आलं.


नरेंद्र मोदी यांच्या काळात अनेक योजना आणल्या गेल्या. जनधन योजना, मुद्रा योजना, जन सुरक्षा योजना, उज्ज्वला योजना, उजाला योजना, पीएम घरकुल योजना, सौभाग्य योजना, आयुष्मान भारत, पीएम-किसान अशा अनेक योजनांचा शुभारंभ झाला. नोटाबंदी सारखा सर्वात मोठा निर्णय मोदींच्या शासनकाळात झाला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्वाचे निर्णय आपल्या कार्यकाळात घेतले, ज्या निर्णयांना अनेक दशकं लक्षात ठेवलं जाईल. नोटाबंदी,  संविधानाच्या 370 कलमानुसार जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा दिला. तिहेरी तलाक कायदा करत मुस्लिम महिलांना कुप्रथेतून मुक्त केलं. सोबतच कित्येक वर्षांपासून सुरु असलेला राम मंदिराचा प्रश्न मिटवला.


एक मात्र असं की, मोदी पंतप्रधान असताना  एनडीएचे दोन मुख्य पक्ष शिवसेना आणि शिरोमणि अकाली दल (एसएडी) एनडीएतून बाहेर पडले. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून परराष्ट्र संबंध बळकट करण्यावर देखील सर्वाधिक जोर दिला. त्यांच्या कार्यकाळात अनेक देशांसोबत अनेक महत्वाचे करार देखील करण्यात आले आहेत. पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचा जागतिक पातळीवर देखील सन्मान केला गेला आहे.