लखनौ : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये तरुणीवर झालेल्या गँगरेपनंतर देशभरात संतापाचं वातावरण आहे. एकीकडे लोकांमध्ये रोष आहे तर दुसरीकडे बाराबंकीमधील भाजप नेत्याने वादग्रस्त आणि संतापजनक वक्तव्य करुन मृत तरुणीचं चारित्र्यहनन केलं आहे. सर्व मृत मुली बाजरी, मका, ऊस आणि डाळींच्या शेतातच का सापडतात, असं वक्तव्य बाराबंकी नगरपरिषद नवाबगंजचे चेअरमन आणि भाजपचे नेते रणजीत श्रीवास्तव यांनी केलं आहे..


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रणजीत श्रीवास्तव म्हणतात की, "प्रेमप्रकरणातून मुलीने मुलाला बाजरीच्या शेतात बोलावलं असेल. तिला नातेवाईकांनी पकडलं असणार, कारण शेतात हेच तर होतं. ज्या मुलींचा अशाप्रकारे मृत्यू होतो त्या डाळीच्या, ऊसाच्या, मक्याच्या, बाजरीच्या किंवा नाल्यात अथवा जंगलात सापजतात. त्या धान किंवा गव्हाच्या शेतात मृतावस्थेत सापडत नाही आणि त्यांना कोणीही ओढत घेऊन जात नाही. अखेर अशा ठिकाणीच या घटना का होतात हा तपासाचा विषय आहे आणि मी चुकीचं बोललेलो नाही."


मुलींवर योग्य संस्कार नसल्यानं बलात्कार, भाजप आमदाराची मुक्ताफळं


रणजीत श्रीवास्तव यांनी याआधीही मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मुली ऊस, बाजरी आणि मक्याच्या शेतात गवत कापायला का जातात? या मुलींना एकांतात गवत कापायचं असतं त्यावेळी त्यांना ऊस, मका, बाजरीचचं शेत दिसतं का? दुसरीकडे त्यांना गवत मिळत नाही का? असं वक्तव्य श्रीवास्तव म्हणाले होते.


दरम्यान आम आदमी पक्षाने या भाजप नेत्याचा व्हिडीओ शेअर करुन जोरदार टीका केली आहे. रणजीत श्रीवास्तव यांचा व्हिडीओ शेअर करताना आम आदमी पक्षाच्या ट्विटर हॅण्डलवर लिहिलं आहे की, "या भाजप नेत्याचं वक्तव्य ऐकल्यास तुमचं रक्त खवळेल. अशा मुली ऊस, बाजरीच्या शेतातच सापडतात. जंगल आणि नाल्यात सापडतात. तो दिवस येऊच देऊ नका की जन्म होताच मुलीला मारुन टाकलं जाईल किंवा सती प्रथा सुरु केली जाईल. सीबीआयचा तपास झाला आहे, मुलं निर्दोष आहेत. त्या मुलांचं तारुण्य कोण परत करणार?'





भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांची मुक्ताफळं
चांगले संस्कारच बलात्कार रोखू शकतात असं वक्तव्य भाजपचे बलियाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केलं आहे. "मी फक्त एक आमदार नाही तर एक चांगला शिक्षकही आहे. त्यामुळे मी हे सांगतो आहे की आपल्या मुलींवर चांगले संस्कार घडवा. फक्त सरकार आणि तलवारीनं बलात्कारासारख्या घटना रोखू शकत नाहीत. तर चांगले संस्कार बलात्कार रोखू शकतात. गुन्ह्यांवर वचक ठेवणं हे सरकारचं काम आहे यात शंकाच नाही. मात्र मुलींवर चांगले संस्कार घडवणं त्यांना शालीन राहण्यास शिकवणं हे आई-वडिलांचं कर्तव्य आहे. जिथे सरकारचा धर्म सुरक्षा करण्याचा आहे तसा परिवाराचा धर्म आहे संस्कार देण्याचा. सरकार आणि संस्कार मिळून भारताला सुंदर बनवू शकतात," असं सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.


Hathras Case | या मुली नेहमी बाजरीच्या शेतात मेलेल्या अवस्थेत सापडतात; भाजप नेते रंजित सिंह बरळले