Yamuna express-way accident :  उत्तर प्रदेशातील यमुना एक्स्प्रेसवर बोलेरो आणि डंपरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5  जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत. हे सर्वजण पुण्याचे रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यमुना एक्स्प्रेस वेवर गुरुवारी पहाटे झालेल्या अपघातात चार महिलांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, हा अपघात पहाटे 5 वाजता जेवार टोल प्लाझाजवळ झाला. अपघातानंतर सर्व जखमींना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथं पाच जणांना मृत घोषित करण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या दोघांवर कैलास रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील मृत आणि जखमी हे पुण्याचे असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 










यमुना एक्सप्रेस-वे वर गुरुवारी पहाटे हा अपघात झाला. एका बोलेरो कारनं डम्परला पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांना उपचारासाठी कैलास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अपघाताचं वृत्त समजताच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे आणि जखमींवर योग्य उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. 


मुख्यमंत्री कार्यालयानं ट्वीट करत म्हटलं आहे की, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यमुना एक्सप्रेस-वेवर दोन वाहनांमधील अपघातात मृत्यू झालेल्यांप्रती शोक संवेदना प्रकट केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी अपघातात मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे तर जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत की, जखमींवर योग्य ते उपचार करावेत आणि मदत करावी.