माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे केवळ देशाच्या पंतप्रधानपदी तीनवेळा विराजमान झाले नाहीत, तर एक जिंदादिल राजकारणी म्हणूनही आपलं व्यक्तिमत्त्व लोकांसमोर ठेवलं. वाजपेयींच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. हळूवार मनाचा कवी, सेवाभावी माणूस, सौम्य हिंदुत्त्व अशा अनेक गोष्टींनी त्यांचं आयुष्य बनलं.
अटल बिहारी वाजपेयी गेल्या मोठ्या कालावधीपासून राजकीय जीवनापासून दूर होते. ते 93 वर्षांचे होते. विशिष्ट पद्धतीची भाषणशैली आणि कवितांमुळेही प्रख्यात असणारे अटल बिहारी वाजपेयी हल्ली बोलत नव्हते.
अटलजींच्या आयुष्याशी संबंधित 10 गोष्टी :
1. अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी ग्वाल्हेरमध्ये झाला. त्यावेळी भारत इंग्रजांच्या गुलामीत होता. त्यांचं जन्म ठिकाण म्हणजे ग्वाल्हेर हा आता मध्य प्रदेशचा भाग आहे. महात्मा गांधीजी काँग्रेसचे पहिले आणि शेवटचे अध्यक्ष बनले, त्याच दिवशी अटल बिहारी वाजपेयींचा जन्म झाला.
2. 1942 साली भारत छोडो आंदोलनावेळी अवघ्या भारतात स्वातंत्र्य संग्रामाचे वारे वाहू लागले होते, त्यावेळी अटल बिहारी वाजपेयींनी राजकारणात प्रवेश केला. काँग्रेसविरोधात आपलं अवघं राजकारण करणाऱ्या वाजपेयींनी सुरुवातीपासूनच आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली. 1977 साली जनता पार्टीच्या सरकारमध्ये ते परराष्ट्र मंत्री बनले. 1996 साली पहिल्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्यानंतर 1998 आणि 1999 मध्येही ते पंतप्रधान बनले. पंतप्रधानपदाचा पहिला कार्यकाळ केवळ 13 दिवसांचा होता. म्हणजे 16 मे 1996 ते 1 जून 1996. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्यावेळी पंतप्रधानपदी ते 19 मार्च 1998 ते 22 मे 2004 या कालावधीत राहिले.
3. अटल बिहारी वाजपेयींचं वैयक्तिक आयुष्यही अत्यंत रंजक होतं. राजकारणाच्या पलिकडचे अटल बिहारी वाजपेयी अत्यंत हळव्या मनाचे आहेत. कवी मनाचे आहेत. राजकारणाच्या चर्चांमध्ये दबक्या आवाजात त्यांच्या प्रेमाचीही चर्चा झाली. राजकुमारी कौल यांच्यावर त्यांचं प्रेम होतं आणि त्यांच्यासोबतही कौल राहिल्या. मात्र अटल बिहारी वाजपेयींनी कधीच जाहीरपणे हे सांगितले नाही. पण, 'मी अविवाहित आहे, पण ब्रम्हचारी नाही', असे सांगायला मात्र ते डगमगले नाहीत.
4. अटल बिहारी वाजपेयींना कुणी अपत्य नाही, मात्र त्यांनी नमिता कौल हिला दत्तक मुलगी मानलं, तिला सांभाळलं. नमिता कौल यांचं लग्न रंजन भट्टाचार्य यांच्याशी झालं.
5. अटल बिहारी वाजपेयी मूळचे ग्वाल्हेरचे. मात्र 1991 ते 2004 पर्यंत त्यांनी लखनऊचं लोकसभेत प्रतिनिधीत्त्व केलं. वाजपेयी हे एकमेव काँग्रेस व्यतिरिक्त इतर पक्षाचे पंतप्रधान होते, ज्यांनी पंतप्रधानपदाची 5 वर्षांची कारकीर्द पूर्ण केली.
6. अटल बिहारी वाजपेयी हे राजकीय नेत्यासोबतच कवीही होते. पंतप्रधान असताना त्यांचा एक कवितासंग्रही प्रकाशित झाला.
अटलजींच्या कवितेच्या ओळी :
"पृथ्वी लाखों वर्ष पुरानी, जीवन एक अनंत कहानी
पर तन की अपनी सीमाएं, यद्यपि सौ वर्षों की वाणी
इतना काफी है, अंतिम दस्तक पर खुद दरवाजा खोलो।"
7. अटल बिहारी वाजपेयीने 1998 मध्ये पंतप्रधान असताना पोखरण-2 अणूचाचणी केली. त्यांच्या काळात पाकिस्तानविरोधात कारगिल युद्धही झालं आणि त्यात भारताचा विजय झाला.
8. अटल बिहारी वाजपेयी हे एक उत्कृष्ट पंतप्रधान म्हणून नावाजले, मात्र त्याचसोबत उत्कृष्ट खासदार म्हणूनही त्यांचा अनेकदा गौरव झाला. संपूर्ण राजकीय कारकीर्दीत 10 वेळा लोकसभेत आणि दोनवेळा राज्यसभेत खासदार म्हणून निवडून गेले.
9. अटल बिहारी वाजपेयींच्या काही निर्णयांवर टीकाही झाली. गुजरात दंगलींनंतर तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना राजधर्माचं पालन करण्याची आठवण करुन देणे आणि नंतर त्या विधानावरुन त्यांनी यूटर्न घेतला. 1983 मध्ये आसाममधील नीलीमध्ये त्यांनी केलेल्या भाषणावरुनही त्यांच्यावर मोठी टीका झाली होती.
10. अटल बिहारी वाजपेयींचं हिंदी भाषेवरील प्रेमही सर्वश्रुत आहे. परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी संयुक्त राष्ट्रात हिंदीत भाषण केलं. संयुक्त राष्ट्रात हिंदीत भाषण करणारे ते पहिले परराष्ट्र मंत्री होते.
अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्राणज्योत मालवली. ते 93 वर्षांचे होते. किडनी संसर्गामुळं वाजपेयी यांना 11 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या 24 तासांपासून त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
93 वर्षीय वाजपेयींना विविध आजारांनी ग्रासलं होतं. त्यांना किडनी संसर्ग तर होताच, शिवाय मूत्रसंसर्ग, छातीदुखी, मधुमेह यासारख्या आजारांनी वाजपेयी त्रस्त होते.
वाजपेयींनी तीन वेळा भारताचं पंतप्रधानपद भूषवलं. जिंदादिल राजकारणी, हळूवार मनाचा कवी, सेवाभावी माणूस, सौम्य हिंदुत्त्ववादी म्हणून अटल बिहारी वाजपेयी परिचीत होते. हिंदुत्ववादी भूमिकेकडे झुकले असूनही वाजपेयींनी नेहमीच धर्मनिरपेक्षतेची बाजू घेतली. त्यामुळेच त्यांना ‘राईट मॅन इन राँग पार्टी’ असं म्हटलं गेलं.
संबंधित बातम्या
मी नि:शब्द आणि शून्यात, मोदींची प्रतिक्रिया, वाजपेयींच्या निधनाने देश हळहळला
राजकारणातला महाऋषी हरपला, अटल बिहारी वाजपेयींचं निधन
अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी निगडीत 15 रंजक गोष्टी
वाजपेयींमुळे मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो: मनोहर जोशी
हार नहीं मानूँगा, रार नयी ठानूँगा; वाजपेयी-हळव्या मनाचे कवी आणि पत्रकार