नवी दिल्ली : भारतीय संघातील माजी जलद गोलंदाज प्रवीण कुमारने एक व्यक्तीला आणि लहान मुलाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. दारुच्या नशेत प्रवीण कुमारने हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये प्रवीण कुमार राहत असलेल्या परिसरातच हा प्रकार घडला आहे. या धक्काबुक्कीत मुलाच्या हाताचं बोट फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळत आहे. जमलेल्या गर्दीने प्रवीण कुमारचे फोटो, व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तो तोंड लपवताना दिसला. याप्रकरणी प्रवीण कुमारविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण कुमार मेरठमधील बागपत रोडवरील मुलताननगर येथून आपल्या गाडीने जात होता. त्यावेळी एक स्कूल बस मुलांना शाळेत घेऊन जाण्यासाठी रस्त्यात उभी होती. बसमुळे प्रवीण कुमारची गाडी पुढे जाऊ शकत नव्हती. यावेळी प्रवीण कुमारने जोरजोरात हॉर्न वाजवण्यास सुरुवात केली. याठिकाणी राहणारे दीपक शर्मा त्यांच्या सात वर्षाचा मुलाला बसमध्ये सोडण्यास आले होते. मात्र हॉर्न देऊनही बस रस्ता देत नसल्याचं पाहून प्रवीण गाडीतून बाहेर उतरला आणि दीपक शर्मा यांना शिवीगाळ करु लागला.


प्रवीण कुमारचं वर्तन पाहून दीपक शर्मा यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं. या बाचाबाचीदरम्यान प्रवीण कुमारने आपल्याला आणि मुलाला धक्काबुक्की केल्याचा आरोप दीपक शर्मा यांनी केला. प्रवीण कुमारने धक्का दिल्याने मुलगा खाली पडला आणि त्याचं हाताचं बोट फ्रॅक्चर झाल्याची माहिती दीपक यांनी दिली.


सगळा प्रकार घडत असताना त्याठिकाणी गर्दी जमली होती. प्रवीण कुमार दारुच्या नशेत गोंधळ घालत असल्याचं पाहून लोकांनी विरोध सुरु केला. लोकांचा विरोध पाहून अखेर प्रवीण कुमारने तिथून निघण्याचा निर्णय घेतला. घटना घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर मुलाची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर बोटाला फ्रॅक्चर असल्याचं समोर आलं.


दीपक शर्मा यांनी याप्रकरणी मेरठच्या टीपी नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली असून मारहाणीत प्रवीण कुमारलाही किरकोळ जखम झाल्याचं समोर आलं आहे.