श्रीनगर : वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटीअंतर्गत बहुतांश वस्तूंवरील करांच्या दरावर केंद्र आणि राज्यांमध्ये सहमती झाली आहे. श्रीनगरमध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली, गुरुवारी सुरु झालेल्या दोन दिवसीय जीएसटी परिषदेत, दररोजच्या वापरातील वस्तूंवरील कराचे दर घटवण्याचा निर्णय घेण्यात आला.
एकूण 1200 हून अधिक वस्तूंवरील जीएसटीचे दर प्रत्यक्षात कमी होतील. आता जो टॅक्स आकारला जातो, त्यापैकी कोणत्याही वस्तूवरील कर वाढलेला नाही, उलट कमी झाला आहे. यामुळे करचोरीला आळा बसेल, असं अरुण जेटली यांनी सांगितलं.
नव्या कर रचनेनुसार, अनेक वस्तूंच्या किंमती स्वस्त होण्याची शक्यता आहे. दूध आणि अन्नधान्य करमुक्त करण्यात आलं आहे. शिवाय प्रोसेस्ड फूडही स्वस्त होणार आहे.
देशात 1 जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी होणार आहे.
जीएसटी परिषदेने पहिल्या दिवशी सहा वस्तू वगळता सर्व वस्तूंवर 5, 12, 18, आणि 28 टक्क्यांच्या कराचा दर निश्चित केला होता. मिठाई, खाद्य तेल, साखर, चहा पावडर, कॉफी, कोळसा, मसाले आणि औषधं इत्यादींना 5 टक्के कराच्या स्लॅबमध्ये ठेवण्यात आलं आहे.
केसांचं तेल, टूथपेस्ट आणि साबणवर 18 टक्के कर लावण्यात येईल. सध्या यावर 28 टक्के कर आकारला जातो. तर मनोरंजनावरही 18 टक्के कर आकारण्यात येईल.
सूत्रांच्या माहितीनुसार, छोट्या चारचाकींवर 28 टक्के करासह सेसही लावण्यात येईल. तर लग्झरी कारवर टॅक्सह 15 टक्के सेस जोडला जाईल. एसी आणि फ्रीजवरही 28 टक्के कर आकरला जाईल. सध्या या वस्तूंवर 30-31 टक्के कर आकारला जातो.
दरम्यान, सोनं, तंबाखूजन्य पदार्थ तसंच सेवाकराचे दर आज निश्चित होणार आहेत.