विजय मल्ल्याचं अलिबागमधील 100 कोटींचं फार्महाऊस ईडीकडून जप्त
एबीपी माझा वेब टीम | 18 May 2017 10:20 PM (IST)
नवी दिल्ली : भारतातील बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून परदेशात पळालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याला ईडीनं दणका दिला आहे. ईडीने मल्ल्याचे अलिबागमधील सुमारे 100 कोटी रुपयांचे फार्म हाऊस ताब्यात घेतले आहे. मांडवा येथे समुद्र किनाऱ्यालगत मल्ल्याचे 17 एकरच्या जागेवर अलिशान फार्महाऊस आहे. गेल्यावर्षी या फार्म हाऊसवर तात्पुतरी जप्तीची कारवाईदेखील करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी फार्म हाऊसमध्ये राहणाऱ्यांना ईडीने जागा खाली करण्याची नोटीस दिली होती. ईडीच्या मुंबईतील पथकाने मल्ल्याचे अलिशान फार्म हाऊस बुधवारी जप्त केले. या मालमत्तेची किंमत ईडीने 25 कोटी रुपये असल्याचे म्हटले असले तरी बाजारभावानुसार याची किंमत सुमारे 100 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. किंगफिशर प्रकरणात विजय मल्ल्यावर कोट्यवधींचं कर्ज आहे. बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याचा मल्ल्यावर आरोप आहे. मल्ल्याकडून एसबीआय बँकेला 6 हजार 963 कोटींची किंमत येणं अपेक्षित आहे. यापूर्वी आयडीबीआय बँकेचं कर्ज चुकवण्यासाठी ईडीने 1411 कोटींची संपत्ती जप्त केली होती. दुसरीकडे कर्जबुडव्या विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टानं काही दिवसांपूर्वी दणका दिला आहे. सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी मल्ल्याला दोषी ठरवण्यात आलं आहे. तसेच 10 जुलैला मल्ल्याला कोर्टात हजर राहण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. दरम्यान, देशभरातील प्रमुख बँकांना जवळपास 9 हजार कोटींचा चुना लावून लंडनमध्ये पळालेल्या विजय मल्ल्याला 18 एप्रिल रोजी स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटक केली होती. यानंतर त्याला वेस्टमिंस्टर न्यायालयासमोर हजर केलं होतं. पण न्यायालयानं त्याची जामीनावर मुक्तता केली होती. संबंधित बातम्या