जामनगर/ गुजरात : इंडियन एअरफोर्सची फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदीने नवा इतिहास रचला आहे. कारण, फायटर प्लेन चालवणारी ती देशातली पहिली महिला वैमानिक ठरली आहे.
अवनीने गुजरातच्या जामनगरमधून आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर 18 फेब्रुवारी रोजी तिने मिग 21 या फायटर प्लेनसह आकाशात झेप घेतली.
यापूर्वी अवनी महिला फायटर प्लेन चालवत असे. मात्र, त्यावेळी तिच्या मदतीला पुरुष कर्मचारीही असायाचा. पण मिग 21 हे विमान तिने एकटीने चालवल्याने, तिच्य नावावर नव्या इतिहासाची नोंद झाली आहे.
अवनी चतुर्वेदीचा अल्प परिचय
मध्य प्रदेशच्या शहडोलची रहिवासी असलेल्या अवनीचा जन्म 27 ऑक्टोबर 1993 रोजी झाला. तिने प्राथमिक शिक्षण आपल्या गावीच पूर्ण केलं. यानंतर राजस्थानच्या वनस्थली विद्यापीठातून त्यांनी बीटेक पर्यंतचं शिक्षण घेतलं. तिचे वडील दिनकर प्रसाद चतुर्वेदी मध्य प्रदेशच्या बाणसागर धरण प्रकल्पाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते.
2016 मध्ये भारतीय वायूदलात ज्या तीन महिला वैमानिकांचा समावेश झाला. त्यापैकी अवनी एक होती. निवडीनंतर पहिल्यांदाच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एअरफोर्समध्ये जाण्याच्या निर्णयाबाबत खुलासा केला.
कल्पना चावलांचा आदर्श
तिने सांगितलं की, “मी तिसरीत असताना टीव्हीवर कल्पना चावलांचं स्पेसशिप क्रॅश झाल्याने मृत्यूची बातमी पाहिली. या बातमीमुळे माझी आई खूप अस्वस्थ झाली होती. ती टीव्हीसमोर बसून सतत रडत होती. त्यावेळी मी त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना सांगितलं की, ‘मी पुढची कल्पना चावला बनेन’.”
यानंतर तिने वायूदलात जाण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. जर त्यांना वायूदलात ग्राऊंड जॉब मिळाला असता, तर त्याचा तात्काळ राजीनामा दिला असता, असं अवनी यांनी या मुलाखतीत सांगितलं होतं.