कैलाश मानसरोवर यात्रेतला राहुल गांधींचा हा पहिलाच व्हिडीओ आहे. त्यात राहुल पर्वतरांगांमध्ये अनेक तीर्थयात्रेकरुंसोबत तंबूबाहेर दिसत आहेत. कायम पारंपरिक कुर्ता पायजम्यात दिसणारे राहुल गांधी या फोटो टीशर्ट, जॅकेट आणि स्पोर्ट्स लूकमध्ये दिसत आहेत. राहुल गांधींनी एका हातात काठीदेखील आहे. तर यात्रेमधील फोटोत त्यांच्यासोबत दिसणाऱ्या तरुणाचं नाव मिहिर पटेल असून तो गुजरातचा आहे.
मिहिर पटेलची एबीपी न्यूजशी बातचीत
एबीपी न्यूजसोबत बोलताना मिहिर पटेलने सांगितलं की, "आमची यात्रा अद्भुत होती. राहुल गांधी आमच्यासोबतच हॉटेलमध्ये थांबल्याचं आम्हाला माहित होतं. दुसऱ्या दिवशी ते आमच्यासोबतच प्रवास करत होते. त्यांच्यासोबत चालणाऱ्या एका व्यक्तीला माझा आणि राहुल गांधी यांच्यासोबत फोटो काढण्याची विनंती केली. राहुल गांधींनी ती मान्य केली. यानंतर मी कुठे राहतो, अशी विचारणाही राहुल गांधींनी केली. राहुल गांधींसोबत सुमारे 8-10 लोक होते. त्यापैकी काही जण सुरक्षारक्षक होते, पण त्यांना ओळखणं कठीण होतं. त्यांच्यासोबत स्थानिक नागरिक होते.
राहुल गांधींकडून व्हिडीओ पोस्ट
याशिवाय राहुल गांधींनी ट्विटरवर एक व्हिडीयोही शेअर केला आहे. या व्हिडीओ पोस्ट करताना राहुल गांधीनी कॅप्शन लिहिलं आहे की, 'शिव हेच ब्रह्मांड आहे'.
राहुल गांधींच्या यात्रेवर प्रश्न
राहुल गांधींच्या कैलाश मानसरोवर यात्रेवर भाजपने प्रश्न उपस्थित केले होते. राहुल गांधीनी शेअर केलेल्या मानसरोवर यात्रेच्या फोटोंवर भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या आणि सोशल मीडिया इनचार्ज प्रीती गांधी यांनी सवाल उपस्थित केले होते. इंटरनेटवरुन फोटो डाऊनलोड करुन ट्वीट करत आहात का? तुम्ही खरंच मानसरोवरमध्ये आहात की, दुसरकडे कुठे? असा प्रश्न प्रीती यांनी यांनी राहुल गांधींना विचारला होता.
एबीपी न्यूजचं वायरल सच
एबीपी न्यूजची टीम प्रीती गांधी यांच्याकडे गेली असता, त्यांनी कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला. तर संबंधित फोटो सर्वात आधी राहुल गांधींनी पोस्ट केला होता. त्यानंतर जस्ट डायलने तो फोटो वापरला, असं एबीपी न्यूजच्या पडताळणीत समोर आलं.
वायरल सचच्या पडताळणीतील सत्य
ज्या फोटोद्वारे प्रश्न उपस्थित केले होते तो फोटो राहुल गांधींनी सर्वात आधी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. राहुल यांच्या ट्वीटनंतर हा फोटो गुगलवरही दिसू लागला. तज्ज्ञांशी केलेल्या बातचीतच्या आधारावर, राहुल गांधींच्या मानसरोवर यात्रेवर संशय निर्माण करणाऱ्या फोटोवरुन केलेला दावा खोटा आहे. राहुल गांधींचा फोटो खरा आहे.