गोवा : कारवारच्या नौदल तळापासून सुमारे तीन सागरी मैल अंतरावरील खोल समुद्रात मच्छीमारी ट्रॉलरला लागलेल्या भीषण आगीत एका मच्छीमाराचा भाजून मृत्यू झाला आहे. तर अन्य एक गंभीर जखमी झाला. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. भारतीय नौदलाने घटनास्थळी रवाना होऊन बचावकार्यात भाग घेतला.


खोल समुद्रात कारवारचे काही मच्छीमार ट्रॉलरवरून मच्छीमारी करीत होते. या मच्छीमारी दरम्यान ट्रॉलरवर आग लागण्याची घटना घडली. अन्न शिजवण्यासाठी या ट्रॉलरवरील मच्छीमारांनी केरोसिनवर चालणारा स्टोव्ह चालू केला होता. या स्टोव्हचा भडका उडून ट्रॉलरच्या इंजिन रूमने पेट घेतला. त्यात एका मच्छीमाराचा भाजून मृत्यू झाला, तर अन्य एक मच्छीमार गंभीर जखमी झाला.


‘जलपद्मा’ असं या मच्छीमारी ट्रॉलरचे नाव आहे. भारतीय नौदलाने आगीवर नियंत्रण मिळवून मच्छिमारी ट्रॉलर व खलाशांना किनाऱ्यावर सुखरूप आणले.


मच्छीमार ट्रॉलरला आग लागल्याची माहिती मिळताच भारतीय नौदलाची अतिजलद नौका मदत कार्यासाठी घटनास्थळी रवाना करण्यात आली. नौदलाच्या जवानांनी तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. नौदलाच्या जहाजावरूनच अन्य मच्छीमारांना धक्क्यावर आणण्यात आले. नौदलाने या घटनेची माहिती स्थानिक पोलीसांना व मच्छीमार खात्याला दिली आहे.