नवी दिल्ली : दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ परिसरात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. रविवारी रात्री विद्यापीठाच्या गेट क्रमांक पाचजवळ ही गोळीबाराची घटना घडली आहे. गेल्या काही दिवसातील ही या परिसरातील तिसरी गोळीबाराची घटना आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दोन अज्ञात लोकांना विद्यापीठाच्या गेटजवळ गोळीबार केला आणि तेथून फरार झाले. सुदैवाने या गोळीबारात कुणीही जखमी झालेलं नाही. विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणारे हल्लेखोर लाल रंगाच्या स्कूटीवरुन आले होते. त्यातील एका हल्लेखोराने लाल रंगाचं जॅकेट घातलं होतं.





जामिया विद्यापीठातील गोळीबाराची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी परिसरात जमायला सुरुवात केली. त्यानंतर लोकांनी दिल्ली पोलिसांविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. गेल्या चार दिवसातील जामिया विद्यापीठ परिसरातील गोळीबाराची ही तिसरी घटना आहे, त्यामुळे लोकांना आपला संताप व्यक्त केला.





शनिवारी शाहीनबाग परिसरात एका तरुणाने हवेत गोळीबार केला होता. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या तरुणाला अटक केली होती. त्याआधी गुरुवारी जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चावर कपिल गुर्जर या हल्लेखोराने गोळीबार केला होता. या गोळीबारात जामिया विद्यापीठातील एक विद्यार्थी जखमी झाला होता.


शाहीनबाग परिसरात गेल्या 50 दिवसांपासून नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणि एनआरसी विरोधात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचं नेतृत्व महिला करत आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शाहीनबागचा मुद्दा समोर आला आणि त्यावरुन राजकारण तापलं.


गोळीबाराच्या घटनेनंतर निवडणूक आयोगाने दिल्ली पोलीस दलातील दक्षिण पूर्वचे उपायुक्त चिन्मय बिस्वाल यांना पदावरून हटवलं आहे आणि त्यांना गृहमंत्रालयाला रिपोर्ट करण्याचे आदेश दिले आहेत. बिस्वाल यांच्या जागी आता कुमार ज्ञानेश यांची याठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.


संबंधित बातम्या