'आजच्या दिवशी दोन वर्षांपूर्वी तिरंगा यात्रेत चंदन गुप्ता याची मुस्लिमांनी हत्या केली होती' असं त्याने एका पोस्टमध्ये म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये 'शाहीन बाग, खेल खत्म' असे आरोपीने लिहिलं आहे. शाहीन बाग परिसरात नागरिकता संशोधन कायद्याच्या विरोधात एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलकांवर त्याने गोळीबार केला. त्याने आणखी एका पोस्टमध्ये लिहिलं आहे 'माझ्या अंत्ययात्रेत मला भगव्यात घेऊन जा, आणि जय श्रीरामच्या घोषणा द्या', 'माझ्या परिवाराची काळजी घ्या' असंही त्यानं एका पोस्टमध्ये लिहिलं आहे. या आरोपी तरुणाला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी सुरु आहे. त्याला न्यू फ्रेंड्स कॉलोनी पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी नेण्यात आले आहे. तसेच घटनास्थळी पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात केली आहे.
दिल्लीच्या जामिया विद्यापीठातून महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजघाटपर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात येणार होते. ही रॅली सुरु होण्याआधीच या तरुणाने गोळीबार केला. ही घटना जामिया विद्यापीठ आणि सुखदेव विहार मेट्रो स्टेशनजवळ घडली. घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितलं की आरोपी या रॅलीकडे येत होता. तो ओरडून 'या मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो' असं म्हणत होता.
शाहीन बागेतील आंदोलकावर तरुणाकडून गोळीबार, जखमी विद्यार्थ्यावर उपचार सुरु
जामिया नगरमधील शाहीन बागेत गेल्या तब्बल 48 दिवसांपासून सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात धरणं आंदोलन सुरु आहे. घटनास्थळावर प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या लोकांच्या मते, एक तरुण शाहीन बागेतून मोर्चाची तयारी करणाऱ्या आंदोलकांसमोर आला आणि त्याने सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलकांवर गोळीबार केला. या गोळीबारात जखमी झालेल्या आंदोलक विद्यार्थ्याच्या हाताला गोळी लागल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं आहे. जखमी तरुणाला उपचारासाठी होली फॅमिली परिसरातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
शाहीन बागेतील आंदोलकांवर गोळीबार होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 15 डिसेंबर रोजी पोलिसांनीच आंदोलकांवर गोळीबार केला होता. मात्र आज पहिल्यांदाच शाहीन बागेतील आंदोलकांवर पोलिसांशिवाय कुणीतरी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे पडसाद दिल्लीसह देशभरात उमटले आहेत.