नवी दिल्ली : ऐन दिवाळीच्या तोंडावर राजधानी दिल्लीत फटाक्यांच्या विक्रीवर पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. देशातलं सर्वात प्रदूषित शहर अशी बदनामी असलेल्या दिल्लीत या निर्णयाची गरज होती, असं मत पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत. तर सरसकट बंदी घालून हिंदू धर्मीयांच्या सणांवरच घाला घातला जात असल्याचं मत काहीजण व्यक्त करत आहेत.

दिल्लीत 1 नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांच्या विक्रीवर सुप्रीम कोर्टाने बंदी घातली आहे. दरवर्षी दिवाळीच्या वेळी दिल्लीतलं प्रदूषण हे अगदी सर्वोच्च पातळीवर असतं. हवेची पातळी इतकी धोकादायक होते, की श्वसनाचे आजार होण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करतात. त्याच पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने हा आदेश जारी केला.

गेल्या वर्षीची परिस्थिती टाळण्यासाठी फटाके बंदी

दिल्ली हे देशातलं सर्वात प्रदूषित शहर आहे. त्यातही दिवाळीवेळी इथल्या हवेत प्रदूषणाचा स्तर अधिक वाढतो. पंजाबी संस्कृतीत खरंतर प्रत्येक गोष्ट दणक्यात साजरी करायची पद्धत आहे. त्यामुळे दिल्लीतल्या फटाक्यांचं प्रमाण इतर शहरांच्या तुलनेत कैक पटीने अधिक असतं.  मागच्या वर्षी तर हे प्रमाण इतकं वाढलं, की शाळांना आठवड्याची सुट्टी जाहीर करावी लागली होती.

सुप्रीम कोर्टाने मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्येच दिल्लीत फटाक्यांची विक्री थांबवली होती. पण मागच्या महिन्यात फटाके विक्रेत्यांनी याचिका दाखल केल्यावर ती काहीशी सैल करण्यात आली. काल शाळकरी मुलांनी कोर्टात धाव घेतल्यावर ही बंदी पुन्हा 1 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली. या काळात दिल्लीतल्या हवेची चाचणी करुन फटाकेबंदीचा कितपत फायदा होतो, हे कोर्टाला तपासायचं आहे. त्यानंतर राजधानीत कायमस्वरुपी फटाक्यांवर बंदी येऊ शकते.

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं पर्यावरणप्रेमी स्वागत करत आहेत. पण काहींना मात्र हे हिंदू सणांवरचं अतिक्रमण वाटत आहे. अगदी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग आणि लेखक चेतन भगत यांनीही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातील पळवाटा

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयात अनेक पळवाटाही आहेत. हा निर्णय केवळ नॅशनल कॅपिटल रिजन अर्थात राजधानी क्षेत्रापुरताच आहे. दिल्लीच्या शेजारी वसलेल्या नोएडा, फरिदाबाद, गुडगावमध्ये हा निर्णय लागू नाही. शिवाय सध्या केवळ विक्रीवरच बंदी आहे. फटाके आधीच खरेदी करुन ठेवले असतील तर तुम्ही ते वाजवू शकता. त्यामुळे या निर्णयाचा कितपत प्रभाव दिसणार याबद्दल शंका आहे.

फटाक्यांशिवाय सण साजराच होऊ शकत नाही, अशी स्थिती बिलकूल नाही. आनंद लुटण्याऐवजी त्याचा अतिरेक केल्यानंतर कोर्टावर अशा निर्णयांची वेळ येते. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे पडसाद इतर हायकोर्टातही दिसून मुंबई-पुण्यासारखी आपली शहरं फटाकेमुक्त होणार का, याकडे लक्ष लागलं आहे.