गांधीनगर : केंद्र सरकारच्या सूचनेनंतर महाराष्ट्रापाठोपाठ गुजरात सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात केली आहे. गुजरात सरकारने व्हॅटमध्ये 4 टक्क्यांनी कपात केल्यामुळे पेट्रोल 2.93 रुपये, तर डिझेल 2.72 रुपयांनी स्वस्त झालं आहे.


गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी याबाबत घोषणा केली. त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्युटी दोन रुपयांनी कमी केल्यानंतर सर्व राज्यांनाही व्हॅटमध्ये कपात करण्यासाठी पत्र पाठवलं होतं. आतापर्यंत महाराष्ट्र आणि गुजरातने केंद्राच्या या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे.

देशभरात पेट्रोलचे दर भडकले आहेत. मुंबईत पेट्रोलचे दर जवळपास 80 रुपयांच्या घरात आहेत. त्यामुळे सरकारवर चौफेर टीका केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी दोन रुपयांनी कमी करत मोठा दिलासा दिला.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये 2015 नंतर सतत घसरण झाली. मात्र त्याचा फायदा ग्राहकांना झाला नाही. कारण केंद्र सरकारने वारंवार त्यावर एक्साईज ड्युटी वाढवली. शिवाय राज्यांमध्येही पेट्रोल आणि डिझेलवर वेगवेगळे कर लावण्यात आलेले आहेत.

राज्यात पेट्रोल 2, तर डिझेल 1 रुपयाने स्वस्त

केंद्र सरकारच्या सूचनेनंतर राज्यातही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्यात येणार आहे. पेट्रोल 2, तर डिझेल 1 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. आज (मंगळवार) होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होणं अपेक्षित आहे.