नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली तडकाफडकी अमेरिकेला रवाना झाले आहेत. नियमित तपासणीसाठी अरुण जेटली रविवारी अमेरिकेला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 'द वायर'च्या वृत्तानुसार, "अरुण जेटली यांच्या मांडीमध्ये सॉफ्ट टिश्यू कॅन्सरचं निदान झालं आहे. हा एक प्रकारचा ट्यूमर असून तो शरीराच्या इतर भागात जलद पसरु शकतो. अमेरिकेत त्यांच्यावर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारकडून जेटलींच्या कॅन्सरबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.


शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय काहीसा कठीण आहे, कारण मागच्याच वर्षी 14 मे 2018 रोजी त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया झाली होती. आता जर किमोथेरपी केली तर त्यांच्या किडनीवर परिणाम होऊ शकतो. तसंच "किडनी ट्रान्सप्लांटनंतर उद्भवलेल्या अडचणींमुळे शस्त्रक्रिया न करता त्यांना लगेचच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळू शकेल," असं जाणकारांचं मत आहे.

दुसरीकडे, दोन आठवड्यांच्या खासगी सुट्टीसाठी अमेरिकेला जात असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे.

अर्थसंकल्प कोण मांडणार?
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकारचा यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार आहे. निवडणुकीमुळे हा अंतरिम अर्थसंकल्प असेल. परंतु अर्थमंत्री अरुण जेटली अमेरिकेला रवाना झाल्याने त्यांच्या गैरहजेरीत अर्थसंकल्प कोण मांडणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे अर्थसंकल्पापूर्वी मोदी सरकारला हा मोठा धक्का समजला जात आहे.

मागील वर्षी एप्रिलमध्ये त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथे ते डायलिसीसवर होते. यानंतर 14 मे रोजी त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली. यादरम्यान अरुण जेटली सुट्टीवर असताना, रेल्वे आणि कोळसा मंत्री पियुष गोयल यांच्याकडे अर्थखात्याचा अतिरिक्त भार देण्यात आला होता. यानंतर 23 ऑगस्ट 2018 रोजी त्यांनी अर्थ मंत्रालयाचा पुन्हा ताबा घेतला होता. पण प्रकृतीच्या कारणास्तव मागील वर्षी एप्रिलमध्ये दहाव्या भारत-ब्रिटेन आर्थिक तसंच आर्थिक संवादासाठी लंडनमध्ये जाऊ शकले नव्हते.