नवी दिल्ली: पाकिस्तान आता फेब्रुवारी 2021 पर्यंत फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) च्या ग्रे लिस्टमध्ये कायम राहणार आहे. FATF ने पाकिस्तानला दिलेल्या 27 पॉईंट अॅक्शन प्लॅनची अंमलबजावणी करण्यात तो देश अयशस्वी ठरला असल्याचा ठपका FATF च्या शुक्रवारी (23 ऑक्टोबर) झालेल्या बैठकीत ठेवण्यात आला.


FATF ही संघटना आंतरराष्ट्रीय दहशतवादाला पुरवण्यात येणाऱ्या फण्डिंग आणि मनी लॉंड्रिंगवर नजर ठेवण्याचे काम करते. अशा काही घटना घडत असतील तर त्यावर नियंत्रण ठेवणे, संबंधित देशाला त्याबाबत निर्देश देणे अशा प्रकारचे काम करते.


FATF चा हा निर्णय पाकिस्तानसाठी धक्कादायक आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान गेले अनेक दिवस FATF च्या ग्रे लिस्टमधून पाकिस्तानला बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांच्या या प्रयत्नांना अपयश आले आहे.


भारताला हव्या असलेल्या मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मौलाना मसुद अझर, झाकीर रेहमान, दाऊद इब्राहिम आणि हाफिज सईद यांच्यावर कारवाई करण्यात पाकिस्तानला आलेले अपयश, मनी लॉंड्रिंग आणि दहशतवाद्यांना पुरवण्यात येणाऱ्या पैशावर नियंत्रण ठेवण्यात अपयश, याचसोबत FATF ने घालून दिलेल्या सहा निर्बंधांचे पालन करण्यात अपयश आल्याबद्दल या बैठकीत पाकिस्तानविरोधात मतदान होऊन त्याला ग्रे लिस्टमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवाद विरोधी लढ्यासाठी भारताने केलेल्या पाठपुरावा आणि मुत्सद्देगिरीचे यश असल्याचं सागण्यात येतंय. या बैठकीत भारताने सांगितले होते की, "युनोने बंदी घातलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तान आसरा देतंय आणि अनेक दहशतवादी कारवायांत गुंतलेल्या दहशतवाद्यांसाठी ते नंदनवन आहे. त्यामुळे त्याला ग्रे लिस्टमध्ये कायम ठेवण्यात यावे."


FATF ने आता पाकिस्तानला फेब्रुवारी 2021 पर्यंत 27 पॉईंट अॅक्शन प्लॅनची अंमलबजावणी करावी असे निर्देश दिले आहेत. तसेच मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांवर बंदी घालावी, असेही पाकिस्तानला खडसावले आहे. ग्रे लिस्टमध्ये अशा देशांना टाकण्यात येते जे दहशतवाद्यांना पुरवण्यात येणाऱ्या पैशावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत आणि युनो तसेच FATF ने वेळोवेळी घालून दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करत नाही.


मौलाना मसुद अझर, झाकीर रेहमान, दाऊद इब्राहिम हे भारतातील 26/11 चा मुंबई हल्ला आणि पुलवामा दहशतवादी हल्ल्यासह भारतातील अनेक दहशतवादी कारवायात गुंतलेले आहेत. या दहशतवाद्यांची संपूर्ण माहिती आणि पुरावे भारताने याआधीच पाकिस्तानला आणि युनोला दिले आहेत. तरीही पाकिस्तान या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे पाकिस्तान या FATF च्या ग्रे लिस्टमध्ये कायम राहावा यासाठी भारत प्रयत्नशील होता.


भारताने केलेल्या या प्रयत्नांमुळेच पाकिस्तानला जून 2018 सालीच या ग्रे लिस्टमध्ये टाकण्यात आले होते. त्यावेळी दहशतवाद्यांवर कारवाई करणे आणि त्यांना पुरवण्यात येणाऱ्या पैशावर नियंत्रण ठेवणे यासाठी FATF ने पाकिस्तानला 2019 सालापर्यंत मुदत दिली होती. पण नंतर कोरोनाच्या कारणामुळे या मुदतीत वाढ करण्यात आली होती.


ग्रे लिस्टमध्ये टाकल्याने काय तोटा?
आधीच पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या कंगाल झाला असून आता FATF ने त्यांना ग्रे लिस्टमध्ये टाकल्याने त्यांच्यापुढील आर्थिक संकट वाढणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणे निधी (IMF), जागतिक बँक (WB), आशियाई विकास बँक (ABD) यांच्याकडून पाकिस्तानला करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय मदतीवर बंधने येणार आहेत. तसेच अमेरिकेसारख्या देशांकडून करण्यात येणाऱ्या मदतीवरही निर्बंध येतील.


फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) काय करते?
1989 साली स्थापन झालेली ही आंतर-देशीय संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवाद्याचे फण्डिग, मनी लॉंड्रिं ग आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेला धोका ठरु शकणाऱ्या घडामोडींवर नजर आणि नियंत्रण ठेवण्याचे काम करते. सध्या या संघटनेचे युरोपियन युनियन आणि गल्फ कौन्सिल कोऑपरेशन (GCC) या संघटनांसह 39 सभासद आहेत. युनो आणि इतर प्रमुख आंतरराष्ट्रीय संघटनांच्या मदतीने याचे कार्य चालते. या संघटनेचे मुख्यालय पॅरिसमध्ये आहे.