नवी दिल्ली: भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. त्यांच्यावर करण्यात आलेली अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे आणि ते आता सुखरुप आहेत. कपिल देव यांचा हॉस्पिटलमधील एक फोटो समोर आला आहे ज्यात ते सुखरुप असल्याचं दिसतं.


कपिल देव यांना गुरुवारी रात्री उशिरा हृदयविकाराचा झटका आल्याने दिल्लीमधल्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागले होते. या बातमीनंतर अनेक भारतीयांनी त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली होती. अँजिओप्लास्टीनंतर कपिल देव यांनी ट्वीट करुन सांगितले की, "मी यातून लवकरचं पूर्णपणे बाहेर येईन. तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल धन्यवाद."





भारताचा दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका; अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेनंतर धोका टळला


कपिल देव यांना दिल्लीच्या फोर्टिज् या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले आहे. त्यांच्यावर करण्यात आलेली कोरोनरी अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे. शुक्रवारी या वृत्ताला दुजोरा देताना हॉस्पिटलच्या प्रशासनाने सांगितले होते की, "61 वर्षीय कपिल देव यांना गुरुवारी रात्री उशिरा हृदयविकाराचा झटका आल्याने अॅडमिट करण्यात आले होते. त्यांची प्रकृत्ती आता स्थिर आहे." येत्या काही दिवसातच त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल असेही हॉस्पिटलच्या प्रशासनाने सांगितले आहे.


भारताचा सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडू
एकेकाळी कसोटी सामन्यात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम नावावर असलेल्या कपिल देव यांनी 1994 मध्ये कसोटी क्रिकेटला रामराम केला होता. हा विक्रम सलग सहा वर्षे त्यांच्या नावावर होता. कपिल देव यांच्या नेतृत्त्वात भारताने 1983 साली पहिला विश्वचषक जिंकला होता. कपिल देव यांनी भारतासाठी 131 कसोटी सामने, 225 एकदिवसीय क्रिकेट सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी अनुक्रमे 5248 आणि 3783 धावा केल्या आहेत.


कपिल देव यांचे आरोग्य चांगले राहावे आणि ते यातून लवकर बरे व्हावेत यासाठी सचिन तेंडुलकर, विराट कोहली, युवराज सिंह यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.