Fatima Sheikh Birth Anniversary : भारतातील वंचित घटकांना शिक्षण मिळावं यासाठी मोलाचं काम केलेल्या फातिमा शेख (Fatima Sheikh) यांची आज जयंती. फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त गुगलनं (Google) त्यांना अनोखा सलाम केला आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त एक डूडल साकारलं आहे. यात त्यांच्या फोटोसह पुस्तकाचं कव्हर दिसून येत आहे. 


त्या काळात दलित, आदिवासी आणि मुस्लिम समाजातील मुलं आणि स्त्रिया शिक्षणापासून वंचित होत्या. त्यांना शिक्षणाचा हक्क मिळावा, ही फातिमा शेख यांची ठाम भूमिका होती. त्यांनी सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांच्यासह अस्पृश्य आणि मुस्लिम समाजातील स्त्रिया व मुलांना शिकविण्याचे काम केले.


फातिमा शेख या उस्मान शेख यांच्या भगिनी होत्या. ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांनी 1848 साली दलित मुले आणि स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू केली. मात्र, हे कृत्य धर्मविरोधी असल्याचा आरोप करण्यात आला. त्यातूनच त्यांच्या कुटुंबियांनी आणि गावातील इतर लोकांनीही या दाम्पत्यावर बहिष्कार टाकला. त्यांना घराबाहेरही काढले. 


अशावेळी उस्मान शेख आणि फातिमा शेख यांनी त्यांना राहण्यासाठी आणि शाळा चालविण्यासाठी राहते घर दिले. या दाम्पत्याच्या कल्पनेने प्रेरीत होऊन उस्मान शेख यांनीही फातिमा शेख यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्याचबरोबर शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याची प्रेरणाही दिली. त्यानंतर सावित्रीबाईंच्या बरोबरीने शेख यांनीही शिक्षिका होण्यासाठी खूप कष्ट सोसले. बाह्मण्यवादी जातीव्यवस्थेविरोधात महात्मा फुले यांनी लढा पुकारला होता. मात्र, त्यांच्यासोबत शेख यांनादेखील सामाजिक रोषाचा, छळाचा सामना करावा लागला. 


फातिमा शेख मुलींना शिकविण्याचे काम करीत असत. घरोघरी जाऊन मुलींच्या कुटुंबाशी बोलून मुलींना शाळेत पाठवायला सांगत. शाळेचे कामकाजही त्याच बघत असत. त्यामुळेच फुले यांचे कार्य पूर्णत्वास नेण्यात शेख यांचे मोलाचे योगदान आहे. शिक्षणाचे कार्य अखंड चालू राहण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सावित्रीबाईंचा त्या मोठ्या आधार होत्या.  सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिराव फुले यांना लिहिलेल्या पत्रांमध्ये फातिमा यांच्याविषयी प्रेमाच्या आणि प्रशंसेच्या भावना व्यक्त केल्या आहेत.