Corona Death :  भारतात कोरोनामुळं मृत्यू  (Corona Death)  झालेल्या रुग्णांची संख्या ही  31 लाख इतकी मोठी असू शकते असा निष्कर्ष सायन्स जर्नलने काढला आहे.  भारतात कोरोनामुळं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही नोंद केलेल्या आकड्यांच्या सहा पट अधिक असू शकते असं सायन्स जर्नलचं म्हणणं आहे..


भारतात कोरोनामुळं (Coronavirus)  झालेल्या मृत्यूंची नोंद केलेली संख्या 4 लाख 83 हजार 178 इतकी आहे. मात्र किमान 31 लाख जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे असा निष्कर्ष सायन्स जर्नलने काढला आहे. संशोधकांनी 10 राज्यांमधील 1 लाख 4 हजार जणांचं फोनवरून सर्वेक्षण केलं. दोन लाख सरकारी आरोग्य केंद्रे आणि नागरिक नोंदणी प्रणालींमधून झालेल्या मृत्यूंचा आकडा गोळा केला. या अभ्यासासाठी संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या विभागाचा डेटाही घेण्यात आला होता. भारतातील कोरोना संसर्गामुळे झालेल्या मृत्यूचे अपूर्ण प्रमाणीकरण आणि या मृत्यूंमागे इतर आजारांची कारणे दिल्याने, खरा आकडा समोर आलेला नाही असं सायन्स जर्नलचं म्हणणं आहे. तसंच सर्वाधिक मृत्यू हे ग्रामीण भागात झाले असून, त्यांची नोंद होऊ शकलेली नाही, असंही या अभ्यासात म्हटलंय. 


 देशात 1 लाख 41 हजार 986 नवीन कोरोना रुग्णांची नोंद


देशात 1 लाख 41 हजार 986 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 285 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत देशात 3 हजार 71 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आडेवारी जाहीर केली आहे. देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये देखील झपाट्याने वाढ होत आहे. आत्तापर्यंत देशात कोरोनामुळे 4 लाख 83 हजार 463 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर आत्तापर्यंत 3 कोटी 44 लाख 12 हजार 740 नागरिक कोरोनातून मुक्त झाले आहेत. सध्या देशात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ही 4 लाख 72 हजार 169 झाली आहे.   दरम्यान, देशात सध्या वेगाने लसीकरण देखील सुरू आहे. 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांना देखील लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे लसीकरण दिवसेंदिवस वाढत आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



महत्त्वाच्या बातम्या: