'फादर्स डे' दिवशीच पित्याची दोन तरुण मुलींसह आत्महत्या, बेळगावातील खळबळजनक घटना
फादर्स डे दिवशीच एका पित्याने आपल्या दोन तरुण मुलींसह आत्महत्या केल्याची खळबळजनक आणि धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील पोगत्यानट्टी गावात घडली आहे.

बेळगाव : आज 'फादर्स डे'चं सगळीकडं सेलिब्रेशन होत असताना बेळगावात मात्र एक धक्कादायक घटना घडली आहे. फादर्स डे दिवशीच एका पित्याने आपल्या दोन तरुण मुलींसह आत्महत्या (Father commits suicide with two young daughters) केल्याची खळबळजनक आणि धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील (Belgaum Latest Update) चिकोडी तालुक्यातील पोगत्यानट्टी गावात घडली आहे.
फादर्स डे दिवशीच पित्याने आपल्या दोन तरुण मुलींसह आत्महत्या केल्याच्या घटनेने पोगत्यानट्टी ग्रामस्थ देखील हादरून गेले आहेत.आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव काडप्पा रंगापुरे (42) असे असून मुलींची नावे कीर्ती (20) आणि स्फूर्ती (18) अशी आहेत. या तिघांनीही घरात गळफास घेवून आत्महत्या केली. काडप्पा यांची पत्नी चन्नव्वा रंगापुरे (40) यांचे एक आठवड्यापूर्वी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते.
पत्नीच्या निधनाचा धक्का काडप्पा सहन करू शकले नाहीत. पत्नीच्या मृत्यूनंतर पुढे आपल्या कुटुंबाचे कसे होणार हीच काळजी त्यांना लागून राहिली होती. त्यामुळे काडप्पा यांनी आपल्या राहत्या घरीच दोन्ही तरुण मुलींसह गळफास घेवून आत्महत्या करून जीवन संपवले. आत्महत्येची घटना कळताच चिकोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. चिकोडी पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
