मुंबई: येत्या 48 तासांमध्ये बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टी निर्माण होणार असून त्यामुळे मोचा चक्रीवादळाची (Cyclone Mocha) निर्मिती होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम पूर्व किनारपट्टीवरील ओडिशा आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांवर होणार असून त्या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आला. दरम्यान, ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी या संबंधित एक बैठक घेऊन सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 


हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. येत्या 48 तासांत या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर 'मोचा' चक्रीवादळाची निर्मिती होणार आहे. हवामान खात्याने येत्या पाच दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे. IMD नुसार पुढील दोन दिवस वायव्य भारतात जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.


 






अमेरिकेचे हवामान अंदाज मॉडेल 'ग्लोबल फोरकास्ट सिस्टम (GFS)' आणि युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्ट (ECMWF) यांनीही बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आयएमडीनेही अशीच भीती व्यक्त केली आहे.


'मोचा' नावाची चर्चा का?


जागतिक हवामान संघटना (WMO) आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर आशिया अँड द पॅसिफिक (ESCAP) च्या सदस्य देशांनी स्वीकारलेल्या नामकरण प्रणाली अंतर्गत या चक्रीवादळाला 'मोचा' असे नाव दिले जाईल. येमेनने या चक्रीवादळाचे नाव 'मोचा' या आपल्या लाल समुद्राच्या किनार्‍यावरील बंदर शहराच्या नावावर सुचवले आहे.


ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक


ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या चक्रीवादळाचा सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीसाठी सर्व सरकारी यंत्रणांनी सज्ज रहावं असा आदेश त्यांनी दिला आहे. 2 मे 2019 रोजी ओडिशात धडकलेल्या फनी चक्रीवादळाचा संदर्भ देत पटनायक म्हणाले की, उन्हाळ्यात चक्रीवादळांचा संभाव्य मार्ग निश्चित करणे कठीण आहे. सखल भागात राहणाऱ्या लोकांना आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. चक्रीवादळानंतरच्या मदत कार्यासाठी सरकारी यंत्रणांनी योजना आखावी असंही त्यांनी सांगितलं आहे.