Farmers Protest Updates दिल्लीतील सिंघू सीमेपाशी मागील कित्येक दिवासंपासून सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलन सुरु आहे. त्याच्याच पार्श्वभूमीवर शेतकरी 26 जानेवारी म्हणजेच देशाच्या प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेडसाठी सज्ज झाले आहेत. पण, त्याच्या या शांततापूर्ण संचलनामध्ये पाकिस्तानकडून काही अडचणी उभ्या केल्या जाऊ शकतात असा इशारा दिल्ली पोलिसांकडून देण्यात आला आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनांच्या निशाण्यावर ही परेड आहे. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानकडून जवळपास 300 ट्विटर अकाऊंट सुरु करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
'गुप्तचर यंत्रणा आणि इतर काही सूत्रांच्या माध्यमातून सातत्यानं मिळणाऱ्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्यासाठी पाकिस्तानकडून जवळपास 308 ट्विटर अकाऊंट सुरु करण्यात आले आहेत', अशी माहिती दीपेंद्र पाठक (Special CP, Intelligence, Delhi Police) यांनी दिली.
प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडला दिल्ली पोलिसांची परवानगी मिळाल्यानंतर पाकिस्तानच्या या कावेबाजपणाची माहिती समोर आली. दरम्यान, अखेर दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडसाठी परवानगी दिली. यासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखत शांततापूर्ण मार्गानं ही परेड पार पाडण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असल्याचंही ते म्हणाले.
Farmers protest update | कथित सुपारी किलरचा यु- टर्न, 'शेतकऱ्यांनी सांगितलं तेच बोललो'
कशी सुरु आहे परेडची तयारी?
गाझीपूर, सिंघू आणि तिकरी सीमा भागात असणारे शेतकरी सध्या ट्रॅक्टर परेडच्या तयारीच्या अंतिम टप्प्यात आहेत. संघटनांच्या प्रतिनिधींच्या माहितीनुसार अतिशय शांततापूर्ण मार्गानं ही परेड पार पडेल. केंद्राच्या कृषी कायदयांविरोधातील भूमिका दर्शवण्यासाठी ही परेड घेण्यात येणार आहे. पाच मार्गांवर या परेडचं आयोजन करण्यात आलं आहे, या मार्गांबाबतचा आराखडा दिल्ली पोलिसांक़़डे सोपवण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी आयोजित करण्यात आलेल्या या परेडमध्ये जवळपास 1 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग असणार आहे.