हैदराबाद : गेल्या महिन्यापासून कोरोनाच्या लसीची लोक आतुरतेने वाट पाहत होते. आता लस आली ही आनंदाची बाब आहे. मात्र लसीचे साईड इफेक्ट्स सध्या चर्चेचा विषय आहे. तेलंगणामध्ये लस घेतल्यानंतर एका महिला आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. महिला आरोग्य कर्मचार्‍याने 19 जानेवारीला कोरोनाची लस घेतली होती. आता जिल्हा एईएफआय (ए़डवर्स इफेक्ट फॉलोईंग इम्युनायजेशन) समिती या प्रकरणाचा तपास करत असून त्याचा अहवाल राज्य एईएफआय समितीला पाठवणार आहे. तेलंगणाच्या सार्वजनिक आरोग्य संचालकांनी ही माहिती दिली आहे.


यापूर्वी तेलंगणातील निर्मल जिल्ह्यातील कुंथळा शासकीय रुग्णालयात विठ्ठल नावाच्या व्यक्तीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. विठ्ठल यांनी 19 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता कोरोनाची लस घेतली होती. ते सरकारी रुग्णालयात ड्रायव्हर म्हणून काम करत होते.. विठ्ठल यांच्या मृत्यूविषयी माहिती देताना निर्मलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, विठ्ठल यांचा मृत्यू आणि कोरोना लस यांचा काहीही संबंध नाही.


देशभरातील लसीकरणाची स्थिती


राज्यात आतापर्यंत 99,885 आरोग्य सेवकांचं लसीकरण झालं आहे. कोविड -19 लसीकरणाच्या देशभरातील मोहिमेच्या नवव्या दिवशी आज 5 राज्यांत मिळून 31,000 पेक्षा अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण झाले. हरियाणा (907), कर्नाटक (2,472), पंजाब (1007), राजस्थान (24586), तामिळनाडू (2494) या राज्यांत मिळून आज संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत एकूण 31,466 लाभार्थ्यांचे लसीकरण झाले. तात्पुरत्या अहवालानुसार कोविड-19 विरुद्ध लसीकरण झालेल्या 28,613 सत्रांत मिळून 16 लाखांवर (16,13,667)आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले.