Farmers Protest Latest Update : शेतकरी आजपासून पुन्हा एकदा आंदोलन (Farmers Agitation) तीव्र करणार आहे. बुधवारपासून शेतकरी दिल्लीच्या (Delhi News) दिशेने वेगाने कूच करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे 'चलो दिल्ली'चा (Chalo Delhi) नारा देत शेतकरी आंदोलनावर कायम असून आजपासून आंदोलन तीव्र करतील. केंद्र सरकार (Central Government) आणि शेतकरी संघटना (Farmers Association) यांच्यातील बैठक पुन्हा एकदा निष्फळ झाली. शेतकरी संघटनांना मोदी सरकारचा प्रस्ताव मंजूर नसल्याने त्यांनी आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली सीमेच्या दिशेने शेतकरी पुढे जात असल्याने पोलीस आणि प्रशासन अलर्टवर आहे.


शेतकरी आंदोलन पुन्हा तीव्र


शेतकरी आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी 21 फेब्रुवारीपासून दिल्लीतील सटी सीमेवर आंदोलन तीव्र करण्याची घोषणा केली आहे. यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाने मंगळवारी दिल्लीच्या टिकरी, सिंघू आणि गाजीपूर सीमेवर अतिरिक्त सुरक्षेसाठी बंदोबस्त तैनात केला आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांना अलर्ट देण्यात आला आहे.


शेतकरी आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांची तयारी


दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या तिन्ही सीमेवर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना मंगळवारी सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे. त्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. पोलीस उपायुक्त जिमी चिराम यांनी सांगितलं की, दिल्ली-हरियाणा सीमेवर निमलष्करी दलांव्यतिरिक्त दिल्ली पोलिसांचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.


पोलिसांसह निमलष्करी दलाच्या तुकड्याही तैनात


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांसह निमलष्करी दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. एकाही आंदोलक किंवा वाहनाला दिल्लीत प्रवेश न देण्याच्या सूचना सुरक्षा कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी यापूर्वीच 30,000 अश्रुधुराचे गोळे जमा केले आहेत. दिल्लीच्या मध्यवर्ती भागात जाणाऱ्या विविध रस्त्यांवरील वाहनांच्या तपासणीशिवाय सोडण्यात येणार नाही, त्यामुळे बुधवारी वाहतूक कोंडी होऊ शकते.


हरियाणामध्ये 50 शेतकरी पोलिसांच्या ताब्यात


मंगळवारी दिल्लीला जाणाऱ्या हरियाणातील सुमारे 50 शेतकऱ्यांना गुरुग्राम पोलिसांनी मानेसरमध्ये ताब्यात घेतलं. राज्य सरकारने मानेसरमधील पाच गावांतील 1810 एकर शेतजमिनी संपादित केल्याचा शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण हरियाणा किसान खाप समितीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आंदोलकांना दोन बसेसमधून मानेसर पोलीस लाइन्स येथे नेण्यात आलं. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी मांडण्यासाठी मंगळवारी दिल्लीतील जंतरमंतरवर मोर्चा काढला आणि यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं.