नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने तीन नवी कृषी कायदे पारित केले होते. त्या विरोधात गेल्या वर्षभरातपासून देशातील अनेक शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरु केलं. त्यांच्यापुढं अखेर केंद्र सरकारने झुकती भूमिका घेत तीनही कायदे मागे घेतले. 


आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता त्यांच्या घरी जावं, आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवावा, एक नवी सुरुवात करावी असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे. येत्या अधिवेशनामध्ये हे तीनही कायदे मागे घेण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे.


गेल्या वर्षभराच्या काळात या आंदोलनामध्ये अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. त्या कोणत्या आहेत ते पाहू,


1. कृषी कायदे पारित केले आणि आंदोलनाला सुरुवात झाली
गेल्या वर्षी केंद्र सरकारने कृषी कायदे पारित केले आणि पंजाब आणि हरयाणा तसेच इतर राज्यातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु केलं. 27 नोव्हेंबर 2020 रोजी दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर पोलिसांनी शेतकऱ्यांवर अश्रूधुराचा मारा केला. या ठिकाणीच शेतकऱ्यांनी आपला ठिय्या मांडला. 


2. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये चर्चा
या कायद्यांना शेतकऱ्यांचा असलेला विरोध लक्षात घेता केंद्र सरकारने शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावलं. पहिली बैठक ही 14 ऑक्टोबर रोजी पार पडली. त्यानंतर डिसेंबर महिन्यात आणखी काही बैठका झाल्या. पण यातून काही निष्पन्न झालं नाही. 


3. 10 व्या बैठकीत कायद्यावर पुनर्विचार करण्यावर चर्चा
नवीन वर्षाच्या सुरुवातीला, 20 जानेवारीला केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात 10 वी बैठक पार पडली. त्यामध्ये हा कायदा बरखास्त करावा किंवा त्यावर पुनर्विचार करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. 


4. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत हिंसाचार
केंद्र सरकारसोबत बोलणी सुरु असताना शेतकरी संघटनांनी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढली. त्या दरम्यान, दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या परिसरात मोठा हिंसाचार झाल्याचं दिसून आलं. या दरम्यान, दिल्लीच्या लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडाही फडकवण्यात आल्याची घटना घडली. 


5. राकेश टिकैत यांना अश्रू अनावर...आंदोलन आणखी तीव्र
या हिंसाचारानंतर काही संघनटांनी या आंदोलनातून माघार घेतली. यावेळी 28 जानेवारीला झालेल्या एका पत्रकार परिषदेत राकेश टिकेत यांना अश्रू अनावर झालं आणि या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं. यामुळे आंदोलन अधिकच तीव्र झालं.


6. ग्रेटा थनबर्गने आंदोलनावर ट्वीट केलं
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला जागतिक स्तरावरुन पाठिंबा मिळू लागला होता. यामध्ये पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ एक ट्वीट केलं. त्यानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी याचा विरोध केला. टूल किट प्रकरणी 20 वर्षाच्या पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवीला अटक करण्यात आली. 


7. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात
सरकार आणि शेतकरी यांच्या चर्चेतून काही मार्ग निघत नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं. न्यायालयाने 11 जानेवारीला या तीनही कायद्यांना स्थगिती दिली आणि यावर चार सदस्यांच्या एका कमिटीची नेमणूक केली. 


8. विरोधी पक्षांनी संसदेत सरकारला घेरलं
एकीकडे शेतकरी आंदोलन सुरु असताना प्रमुख विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारची संसदेत गोची केली. या मुद्द्यावरुन संसदेत मोठा हंगामा झाला. 


9. शेतकऱ्यांची अनेक राज्यांत महापंचायत
या दरम्यान, शेतकरी संघटनांनी अनक राज्यांत महापंचायतीचं आयोजन केलं. यूपी, राजस्थान, हरियाणा, पंजाब या राज्यात महापंचायत झाली. 


10. सरकारने कायदे मागे घेतले
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी, 19 नोव्हेंबर रोजी देशाला संबोधन करताना तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. याची प्रक्रिया येत्या अधिवेशनात पूर्ण केली जाणार आहे. 


संबंधित बातम्या :