नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 20 वा दिवस आहे. सरकारवर दबाव वाढवण्यासाठी आज शेतकरी नेत्यांच्या एका महत्वाच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीकडे सर्वांच्या नजरा आहेत. अजूनही शेतकरी आणि सरकारमध्ये कृषी कायद्यातील मुद्द्यांवरुन मतभेद सुरुच आहेत. आज 20 व्या दिवशी शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत. आजच्या बैठकीनंतर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. शेतकरी नेते आंदोलनासोबत सरकारला चर्चा करण्यासाठी देखील आवाहन करत आहेत. केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, शेतकऱ्यांना चर्चेचा पर्याय अजूनही खुला आहे. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, शेतकरी जर काही प्रस्ताव देत असतील तर आम्ही तयार आहोत. मात्र दुसरीकडे शेतकरी कृषी कायदे परत घेण्याच्या मागणीवर अडून आहेत.


काल 19 व्या दिवशी शेतकऱ्यांनी दिल्ली शहरात प्रवेश करू नये यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. सुरुवातीला सिंघु बॉर्डर येथील चंदीगड नॅशनल हायवेवर सिमेंटचे बॅरिकेट्स लावण्यात आले होते. त्यानंतर मातीने भरलेले ट्रक या रस्त्यावर आडवे लावण्यात आले होते तर काल मोठे मोठे कंटेनर या रस्त्यावर आडवे ठेवण्यात आलेले आहेत. काहीही करून शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करू नये. त्यांच्या गाड्या पुढे जाऊ नये यासाठी पोलिसांनी अशा प्रकारे तयारी केली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी या आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर वॉटर टँकर आणि मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.


हळूहळू या आंदोलनाचे स्वरूप बदलत असून आंदोलन आणखी तीव्र होत आहे. परवा या शेतकऱ्यांकडून दिल्ली जयपूर नॅशनल हायवेवर आंदोलन करण्यात आलं होतं आणि काल या शेतकऱ्यांनी सामूहिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला. सकाळी 8 वाजेपासून तर संध्याकाळी 5 पर्यंत शेतकऱ्यांनी उपोषण केलं. या शेतकऱ्यांच्या 40 प्रतिनिधींनी मंचावर बसून उपोषण करत सरकारचा निषेध व्यक्त करत केला. जोपर्यंत मोदी सरकार हा कृषी कायदा मागे घेत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने आम्ही आंदोलन करत राहू या भूमिकेवर हे शेतकरी ठाम आहेत.



महत्त्वाच्या बातम्या :