नवी दिल्ली : रिलायन्स जिओ (Reliance Jio)ने टेलिकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ला पत्र लिहून व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल विरोधात तक्रार दाखल केली आहे. व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल पंजाबमधील शेतकरी आंदोलनाचा फायदा घेत असल्याचा आरोप जिओने केला आहे. टेलिकॉम सेक्रेटरी एस के गुप्ता यांना जियोने लिहिलेल्या पत्रात रिलायन्स जियोने व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलवर आरोप करत म्हटलं आहे की, दोन्ही कंपन्यांनी ट्रायच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे.


जिओने पत्रात आरोप केले आहेत की, वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल उत्तर भारतातातील विविध भागांतील ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनैतिक मार्गांचा वापर करत आहेत. शेतकरी आंदोलनामुळे निर्माण झालेल्या संतापाचा फायदा घेण्यासाठी या कंपन्या खोट्या प्रचाराचा आधार घेत आहेत. रिलायन्स जियोचं म्हणणं आहे की, यापूर्वी 28 सप्टेंबर, 2020 मध्येच जिओने ट्रायला एक पत्र लिहून आपला आक्षेप नोंदवला होता. परंतु असे असूनही या दोन्ही कंपन्यांनी कायदा असल्याचे भासवून आपली नकारात्मक प्रसिद्धी कायम ठेवली आहे.


रिलायन्स जिओने आरोप केला आहे की, या दोन प्रतिस्पर्धी कंपन्यांचं आपले कर्मचारी, एजंट्स आणि रिटेलर्समार्फत रिलायन्सच्या विरोधात नेगेटिव्ह कॅम्पेन सुरु आहे. ग्राहकांना चुकीच्या पद्धतीने अमिष दाखवून जियोमधून पोर्ट करुन स्वतःकडे आणण्याचा या कंपन्या प्रयत्न करत आहेत. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया ग्राहकांना कशा पद्धतीने फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. याचे काही फोटो आणि व्हिडीओही पुरावे म्हणून रिलायन्स जिओने ट्रायकडे सोपावले आहेत.


व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल स्वतःला शेतकरी समर्थक आणि रिलायन्स जियोला शेतकरी विरोधी सांगून आंदोलन आणखी चिघळवण्याचं काम करत आहेत. रिलायन्स जिओने आरोप लावले आहेत की, दोन्ही कंपन्यांनी संपूर्ण देशात जिओ विरोधात खोटा प्रचार करण्याचं काम करत आहेत. यामुळे रिलायन्स जिओच्या ग्राहकांच्या मनातील प्रतिमेला नुकसान पोहोचत आहे.


एअरटेलचं मत काय?


जिओने केलेल्या तक्रारीवर एअरटेलने जियोने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. एअरटेलचं म्हणणं आहे की, एअरटेलने टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये 25 वर्षांपर्यंत ग्राहकांना सेवा पुरवली आहे. या दरम्यान, कंपनीने आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच कंपनीने आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांचा नेहमीच सन्मान केला आहे.