Rail Roko| कृषी कायद्याविरोधात आज शेतकऱ्यांचे देशव्यापी रेल रोको अभियान
दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकरी संघटना आपलं आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला असून आज देशभरात चार तासासाठी रेल रोको अभियान राबवणार आहे.
नवी दिल्ली : तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याची घोषणा केली आहे. दिल्लीच्या सीमांवर जवळपास 87 दिवसांपासून शेतकरी आंदोलनाचं नेतृत्त्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) आज देशभरात रेल रोको अभियान राबवणार आहे.
शेतकरी संघटनेतर्फे चार तासांसाठी रेल रोको अभियान राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे अभियानाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दुपारी 12 वाजल्यापासून चार वाजेपर्यंत संपूर्ण देशभरात रेलरोको अभियान राबवण्यात येणार आहे. पंजाब, हरिायणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिमबंगालवर रेल्वेने विशेष लक्ष केंद्रीत केले असून कोणतेही हिंसक वळण लागणार नाही याची काळजी घेतली आहे.
संयुक्त किसान मोर्चाने शांततेने अभियान राबवण्याचे आवाहन केले आहे. 12 वाजल्यापासून चार वाजेपर्यंत संपूर्ण देशभरात रेलरोको अभियान राबवलं जाईल.दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच लोकसभेत शेतकऱ्यांचं आंदोलन पवित्र असल्याचं म्हटलं. सोबतच आंदोलनजीवींनी हे आंदोलन अपवित्र केल्याचं सांगितलं. पंतप्रधान मोदी म्हणाले की, "संसद आणि सरकार शेतकऱ्यांचा अतिशय आदर करतं आणि तिन्ही कृषी कायदे कोणासाठीही बंधनकारक नाही तर पर्यायी आहेत. अशात विरोधाचं कोणतंही कारण नाही."
आपल्या मागणीसंदर्भात शेतकऱ्यांनी 26 जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅली काढली होती. या दरम्यान दिल्लीच्या अनेक भागांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर शेतकरी संघटनांनी 6 फेब्रुवारी रोजी तीन तासांच्या चक्काजामची घोषणा केली होती.