नवी दिल्ली : प्रियांका गांधींचा राजकीय प्रवेश झाला आणि भाजपने पहिला मुद्दा काढला घराणेशाहीचा. काँग्रेस हा पक्ष कसा एकाच कुटुंबाची संपत्ती बनलाय वगैरे... अगदी पंतप्रधानांनीही पहिल्याच दिवशी प्रियांकांचं नाव न घेता काँग्रेसच्या याच संस्कृतीवर हल्लाबोल केला. पण हा झाला केवळ सोयीचा मुद्दा. वास्तव असं आहे की घराणेशाहीची कीड केवळ काँग्रेसलाच नव्हे तर सर्वच पक्षांना लागलीय. त्यातही भाजपला तर यावर बोलण्याचा नैतिक अधिकार मुळीच राहिलेला नाही.
भाजपमध्येही घराणेशाहीची लांबलचक यादी आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्र पंकज हे आमदार आहेत. केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल मिझोरमचे राज्यपाल आहेत. भाजपच्या वसुंधरा राजे यांच्या कुटुंबातही काँग्रेसप्रमाणे तिसरी पिढी राजकारणात आहे. आई विजयाराजे शिंदे भाजपच्या खासदार, वसुंधरा मुख्यमंत्री आणि आता मुलगा दुष्यंत राजस्थानात आमदार आहेत.
महाराष्ट्रातही मुंडे, महाजन यांच्या घराणेशाहीने सगळी पदं घरातच ठेवलेली आहेत. शिवाय एकनाथ खडसे स्वत: आमदार- मंत्री राहिलेत, सून रक्षा खासदार आणि पत्नी महानंदाच्या अध्यक्षा आहेत.
ज्या गांधींच्या नावाने काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप लावायला भाजप सरसावते, तेच गांधी भाजपमध्ये आले की मात्र गोड होतात. वरुण गांधी खासदार असताना, त्यांच्या आई मेनका मोदींच्या मंत्रिमंडळात आहेत. एकाच घरात पदं कशी? हा प्रश्न इथे का लागू होत नाही, याचं उत्तर मिळत नाही. त्यामुळे प्रियांका गांधींवर टीका करताना घराणेशाहीऐवजी भाजपने आता दुसऱ्या मुद्द्यांचा शोध घ्यायला हवा.
मोदींविरोधात आघाडी करायला निघालेले सगळे पक्ष घराणेशाहीची परंपरा चालवणारे आहेत असा आरोप भाजप नेते करतात. पण जे चित्र यूपीएचं तेच एनडीएचं आहे. घराणेशाहीचे मूर्तीमंत प्रतीक बनलेले अनेक पक्ष सत्तेसाठी भाजपला चालतात.
यूपीएच्या बाजूला डीएमके (करुणानिधी), राष्ट्रवादी (पवार) समाजवादी पक्ष (मुलायम) राजद (लालू यादव) नॅशनल कॉन्फरन्स (अब्दुल्ला) पीडीपी (मुफ्ती) अशी घराणेशाही आहे.
एनडीएतल्या नऊ मित्रपक्षांपेकी पाच पक्ष हे एकेका कुटुंबाची संपत्ती बनलेत.
शिवसेना- ठाकरे
लोकजनशक्ती- रामविलास पासवान
अकाली दल- बादल
अपना दल- पटेल
पीएमके- रामदास
आपण कसे वेगळे आहोत हे दाखवायला भाजपने घराणेशाहीच्या वेगवेगळ्या व्याख्या शोधल्यात. अमित शाह म्हणतात सोनियांच्या नंतर काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार हे सगळ्यांना माहिती होतं. पण माझ्यानंतर भाजपचा अध्यक्ष कोण होणार याचं उत्तर कुणी देऊ शकेल का? याला म्हणतात घराणेशाही! राज्याराज्यांत भाजपच्या घराणेशाहीचे गड प्रस्थापित होत चाललेत ही गोष्ट ते विसरतात.
स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षांपैकी जवळपास 48 वर्षे देशाची सत्ता गांधी कुटुंबाच्या ताब्यात राहिलेली आहे. त्यामुळे काँग्रेसवर हा शिक्का लागणं साहजिक आहे. काँग्रेसला गांधींशिवाय पर्याय दिसत नाही ही त्या पक्षासाठी दुर्दैवाचीच बाब. गांधी नावाचं वलय शाबूत राहावं, म्हणून राज्यातल्या कर्तबगार नेत्यांना दाबून टाकण्याचे प्रयत्न काँग्रेसमध्येही झालेले आहेतच. पण या घराणेशाहीवर टीका करण्याइतके विरोधीपक्षही धुतल्या तांदळ्याचे राहिलेले नाहीत. त्यामुळे घराणेशाही ही भारतीय राजकारणातली अपरिहार्यता बनत चाललीय हे कटू वास्तव आता स्वीकारण्याची वेळ का आलीय याचा विचार सर्वांनीच करायला हवा.
घराणेशाहीवर टीका म्हणजे 'हमाम में सब नंगे है' सारखी!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jan 2019 03:56 PM (IST)
मोदींविरोधात आघाडी करायला निघालेले सगळे पक्ष घराणेशाहीची परंपरा चालवणारे आहेत असा आरोप भाजप नेते करतात. पण जे चित्र यूपीएचं तेच एनडीएचं आहे. घराणेशाहीचे मूर्तीमंत प्रतीक बनलेले अनेक पक्ष सत्तेसाठी भाजपला चालतात.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -