नवी दिल्ली : दहशतवादाचा मार्ग सोडून सैन्यात सामील झालेले लान्सनायक नाझीर वाणी यांचा मरणोत्तर अशोकचक्र पुरस्काराने सन्मान होणार आहे. दहशतवादासारखा नापाक मार्ग सोडलेल्या एखाद्या जवानाचा देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशोकचक्र मिळवणारे ते पहिले काश्मिरी जवान आहेत.
नाझीर वाणी यांनी 2004 मध्ये आत्मसमर्पण केलं होतं. काही काळानंतर वाणी भारतीय सैन्यात सामी झाले होते. कधीकाळी सैन्याविरोधात लढणाऱ्या या शूर जवानाने अतिरेक्यांसोबत लढताना 23 नोव्हेंबर, 2018 रोजी आपले प्राण देशाला अर्पण केले.
दहशतवादाचा मार्ग सोडून सैन्यात भरती
जम्मू काश्मीरच्या कुलगामधील अश्मूजी गावात राहणारे नाझीर वाणी एकेकाळी दशतवादी होते. वाणीसारख्या लोकांना काश्मीरमध्ये 'इख्वान' शब्दाचा वापर केला जातो. बंदूक हातात घेऊन कोणाकडून कोणत्याही गोष्टीचा बदल घेण्यासाठी ते बाहेर पडत असत. पण काही काळाने त्यांना चुकीची जाणीव झाली आणि दहशतवादाचा मार्ग सोडून सैन्यात भरती झाले.
अतिरेकी घुसल्याची माहिती
मागील वर्षी 23 नोव्हेंबर 2018 रोजी नाझीर वाणी 34 राष्ट्रीय रायफल्सच्या साथीदारांसोबत ड्यूटीवर होते. तेव्हा शोपियांच्या बटागुंड गावात हिजबुल मुजाहिद्दीन आणि लष्कर ए तोयबाचे सहा अतिरेकी असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून मिळाली होती. अतिरेक्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठी असल्याचंही समजलं होतं. वाणी आणि त्यांच्या टीमवर अतिरेऱ्यांचा पळ काढण्याचा रस्ता रोखून ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
सर्वात मोठं बलिदान
राष्ट्रपतींच्या सचिवालयात जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात लिहिलं आहे की, "लान्सनायक वाणी यांनी दोन अतिरेक्यांचा खात्मा करुन आपल्या जखमी साथीदाराला वाचवून मोठं सर्वात मोठं बलिदान दिलं आहे. धोका जाणवताच अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आणि ग्रेनेडही फेकले. अशा वातावरणात वाणी यांनी एका दहशतवाद्याला जवळून गोळी मारुन त्याचा खात्मा केला."
दोन अतिरेक्यांचा खात्मा
23 नोव्हेंबर 2018 रोजी झालेल्या या चकमकीत वाणी आणि त्यांच्या साथीदारांनी एकूल सहा अतिरेक्यांना कंठस्नान घातलं. यापैकी दोन अतिरेक्यांचा खात्मा वाणी यांन स्वत: केला होता. चकमकीत ते गंभीर जखमी झाले होते आणि रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडले. 26 नोव्हेंबर रोजी अंत्यसंस्काराआधी नाझीर वाणी यांना त्यांच्या गावात 21 तोफांची सलामी देण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत.
सर्वोच्च शौर्य पुरस्कार
नाझीर वाणी यांना मरणोत्तर अशोकचक्र देण्यात येत आहे, जो शांतता काळात दिला जाणारा भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. अशोकचक्रानंतर किर्तीचक्र आणि शौर्यचक्र दिला जातो. वाणी यांनी दोन वेळा (2007 आणि 2017) सैन्याचं पदक मिळवलं, यावरुनच त्यांच्या शूरतेचा, वीरतेचा अंदाज येऊ शकतो. वाणी यांच्यासह यंदा चार अधिकारी आणि जवानांना किर्तीचक्र आणि 12 जणांना शौर्यचक्राने गौरवण्यात येणार आहे.
दहशतवादी ते सैनिक, लान्सनायक नाझीर वाणी यांना मरणोत्तर अशोकचक्र
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jan 2019 01:29 PM (IST)
कधीकाळी सैन्याविरोधात लढणाऱ्या या शूर जवानाने अतिरेक्यांसोबत लढताना 23 नोव्हेंबर, 2018 रोजी आपले प्राण देशाला अर्पण केले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -