नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या रू. 2000 च्या नव्या नोटांच्या सहजासहजी बनावट बनवता येणार नसल्याचा दावा करण्यात आला असला तरी तो फोल ठरला आहे. पाकिस्तानात बनवलेल्या दोन हजार रूपयांच्या नव्या नोटा बांगलादेशमार्गे भारतात पाठवल्या जात असल्याचं आता उघड झालंय. भारत आणि बांगलादेश यांच्यातील खुल्या बॉर्डरचा फायदा घेऊन या बनावट नोटा भारतात पाठवल्या जात असल्याचंही उघड झालंय.


दोन हजार रूपयांच्या बनावट नोटेसाठी स्मगलर्सला फक्त 400 ते 600 रूपये द्यावे लागतात. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि एनआयए यांच्या संयुक्त कारवाईत बांगला देशमार्गे भारतात येणाऱ्या अनेक बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

सर्वात अलीकडची जप्ती अगदी चार दिवसांपूर्वीची आहे. बुधवार, 8 फेब्रुवारी रोजी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये दोन हजार रूपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. पश्चिम बंगालमधल्याच मालदा येथील अझीजुर रहमान याच्याकडून मुर्शिदाबादमध्ये दोन हजार रूपयांच्या बनावट नोटा ताब्यात घेण्यात आल्या. त्याच्याकडे दोन हजारांच्या तब्बल 40 नोटा होत्या. एनआयएने त्याची अधिक चौकशी केली असता, त्याच्याकडे मिळालेल्या नोटा या पाकिस्तानात छापलेल्या असल्याची माहिती मिळाली. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय या बनावट नोटांची छपाई करते. या नोटा बांगलादेशमार्गे भारतात पाठवल्या जात असल्याची माहितीही अझीजुर रहमानकडून मिळाली.

बनावट नोटांच्या छपाईच्या दर्जानुसार त्याची खरी किंमत ठरते. म्हणजे सदोष छपाई असलेली किंवा थोड्या प्रयत्नाने 2000 ची नोट डुप्लीकेट असल्याचं ओळखता आलं तर त्यासाठी 400 रूपये द्यावे लागतात, तर अतिशय काळजीपूर्वक छपाई केलेल्या म्हणजेच बनावटपण सहजासहजी ओलखू न येणाऱ्या 2000 च्या नोटेसाठी 600 रूपये पडतात.

तपास अधिकारी आणि नोटा छपाईतील तज्ञ यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्याच्या दोन हजाराच्या नोटेत असलेल्या 17 सुरक्षा वैशिष्ट्यांपैकी 11 सहजपणे कॉपी करता येतात.

बीएसएफ आणि एनआयए तसंच स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या बनावट नोटांच्या कागदाची क्वालिटी मात्र अतिशय हलक्या दर्जाची असल्याचं निदर्शनास आलं आहे.

नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या दोन हजारच्या नोटेचं पहिलं डुप्लीकेट व्हर्जन डिसेंबर महिन्यातच पकडण्यात आलं होतं. त्यानंतर 22 जानेवारी आणि 4 फेब्रुवारीलाही बनावट नोटांची बांगलादेशमार्गे येणारी खेप पकडण्यात यश आलं होतं.

काही जाणकारांच्या मते रद्द करण्यात आलेल्या जुन्या 500 आणि 1000 च्या नोटांमध्ये जे सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत, तेवढीच दोन हजार रूपयांच्या नव्या नोटेतही आहेत. त्यापेक्षा एकही नवीन सुरक्षा वैशिष्ट्याची भर घालण्यात आलेली नाही, पश्चिम बंगालमधील सिक्युरिटीज प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशनच्या काही अधिकाऱ्यांच्या मते रू. 2000 च्या नोटा एवढ्या वेगाने छापण्यात आल्या की त्यामध्ये काही नव्या सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेशच करता आलेला नाही.