मुंबई : कपड्यांच्या क्षेत्रातील आघाडीचा ब्रॅन्ड असलेल्या फॅब इंडियाने आपल्या जश्न-ए-रिवाज (Jashn-e-Riwaaz) ही दिवाळीची जाहिरात मागे घेतली आहे. ही जाहिरात हिंदू सणाला जश्न-ए-रिवाज असं नाव देऊन त्याची बदनामी करत असल्याचा आरोप भाजप नेते आणि खासदार तेजस्वी सूर्या यांनी केला होता. फॅब इंडियाला या गोष्टीची जबर किंमत मोजावी लागणार असा एक प्रकारचा इशाराच त्यांनी दिला. त्यानंतर कंपनीने त्यांची जाहीरात मागे घेत असल्याचं जाहीर केलं. 


फॅब इंडियाने दिवाळीच्या निमित्ताने जश्न-ए-रिवाज ही एक जाहिरात प्रसिद्ध केली. त्यानंतर या जाहिरातीवरुन मोठा वादंग झाला. सोशल मीडियावर या जाहिरातीवर अनेकांनी टीका केली. गरज नसताना दिवाळीसारख्या हिंदू सणाला मुस्लिम विचारधारेशी जोडल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर भाजप नेते तेजस्वी सूर्या यांनी जोरदार टीका केली. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "हिंदू सणाची मुद्दामहून बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. जाहिरातीतील मॉडेल्सनी पारंपरिक हिंदू पोशाख घातल्याचं दिसून येत नाही. ही जाहिरात मागे घ्यायला हवी. फॅब इंडियाला याचा आर्थिक परिणाम भोगायला लागेल." 


 






फॅब इंडियाच्या या जाहिरातीनंतर सोशल मीडियावर #BoycottFabIndia हा ट्रेन्ड सुरु झाला. अनेकांनी यावर आपलं मत व्यक्त करत कंपनीच्या जाहिरातीवर चांगलीच टीका केली. त्यानंतर कंपनीने त्यांच्या साईटवरून ही जाहिरात काढली आणि इतर ठिकाणाहूनही जाहिरात मागे घेतली. 


महत्वाच्या बातम्या :