नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन भाजपने एका वृत्तपत्रात दिलेली जाहिरात शेअर केली आहे. या जाहिरातीच्या आधारे राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. राहुल गांधींनी लिहिले की वारंवार वारंवार पुनरावृत्ती करूनही खोटं खोटंच असतं.
प्रभात खबर आणि सन्मार्ग नावाच्या वर्तमानपत्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोसह एक जाहिरात छापण्यात आली होती. ही जाहिरात प्रथम 14 फेब्रुवारीला आणि नंतर पुन्हा 25 फेब्रुवारी रोजी छापली गेली. या जाहिरातीमध्ये पंतप्रधान मोदींच्या फोटोसोबत एका एका महिलेचा फोटो देखील छापण्यात आला आहे.
या फोटोसह जाहिरातील असं लिहिलं की, पंतप्रधान आवास योजनेतून मला घर मिळालं. डोक्यावर छप्पर मिळाल्याने सुमारे 24 लाख कुटुंबे स्वयंपूर्ण झाली. एकत्र येऊन आणि एकत्रितपणे आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करुयात. यासह एक घोषणाही लिहिण्यात आली आहे, 'आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर बंगाल'.
मीडिया रिपोर्टनुसार, ज्या महिलेचे चित्र या जाहिरातीमध्ये छापले आहे तिचे नाव लक्ष्मी देवी असे आहे. लक्ष्मीदेवी यांचे स्वतःचे घर नाही. महिन्याकाठी 500 रुपयांच्या भाड्याने त्या एका अगदी लहान खोलीत राहतात. रिपोर्ट्सनुसार लक्ष्मी देवीला हे माहित नव्हते की तिचे हे छायाचित्र कधी घेतले होते. आता या जाहिरातीच्या बहाण्याने विरोधक मोदी सरकारवर खोटा प्रचार केल्याचा आरोप करत आहेत.