नवी दिल्ली : भाजपने 2024 मध्ये होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा 2024 मधील निवडणुकांच्या तयारीसाठी 100 दिवसांचा देशव्यापी दौरा करणार आहेत. यादरम्यान पक्षाचा भर गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये कमकुवत ठरलेल्या राज्यांमध्ये आपली स्थिती मजूबत करण्यावर असेल.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दौऱ्यावर असताना जेपी नड्डा भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांवर लक्षं केंद्रीत करणार आहेत. तसेच दौऱ्या दरम्यान नड्डा राज्यांतील भाजप नेत्यांशी बैठक घेऊन त्या जागांवर लक्षं केंद्रीत करणार आहे, जिथे 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला होता.
RSS च्या पदाधिकाऱ्यांसोबत जेपी नड्डा यांची बैठक
यादरम्यान जेपी नड्डा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबतही बैठक घेणार आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (राजग) ची व्याप्ती वाढविणे हाच या दौऱ्यामागील मुख्य हेतू असेल. तसेच संभाव्य सहयोगी मुद्द्यांवरही जेपी नड्डा राज्यांतील नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. नड्डा यांच्या दौऱ्याचा विस्तृत कार्यक्रम पक्षाच्या वतीने लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या दौऱ्यासाठी राज्यांचं चार श्रेणींमध्ये विभाजन करण्यात आलं आहे. पहिल्या श्रेणीत त्या राज्यांचा समावेश असेल, ज्या राज्यांमध्ये भाजपने मित्र पक्षांच्या साथीने सत्ता स्थापन केली आहे. दुसऱ्या श्रेणीत बिगर भाजप शासित राज्यांचा समावेश असणार आहे. तिसऱ्या श्रेणीत छोट्या राज्यांचा समावेश असणार आहे, तर चौथ्या श्रेणीत ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या राज्यांचा समावेश होणार आहे.
भाजप मुख्यालयाच्या वतीने राज्यातील भाजप नेत्यांना जेपी नड्डा यांच्या दौऱ्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यांची जबाबदारी भाजपचे दोन महासचिव सांभाळणार आहेत. तसेच याव्यतिरिक्त एका अन्य महासचिवांकडे संपूर्ण दौऱ्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पक्षाकडून नड्डा यांच्या दौऱ्यासाठी नऊ विषयांची निवड
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अटी-शर्थींचं पालन करण्याचे आदेश राज्यांना देण्यात आले आहेत. बैठकीदरम्यान कोणत्याही सभागृहात एकत्र 200 हून अधिक लोकांनी गर्दी करू नये अशा सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत. पक्षाने नड्डा यांच्या देशव्यापी दौऱ्यासाठी नऊ विषयांची निवड केली आहे. ज्यामध्ये पक्षाची बांधणी मजबूत करणं, पक्षाप्रती भावना विकसित करणं आणि 2024 लोकसभा निवडणुकांसाठी रणनिती आखणं यांसारख्या विषयांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या :