मुंबई : राज्यात आज पुन्हा अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांचे मात्र प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना घडल्या. यात नाशिक जिल्ह्यातील पुरणगाव येथे वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. नांदेडमध्ये देखील वीज पडून एकाचा मृत्यू तर तीन कामगार जखमी झाले. आजच्या पावसाने पुणे, नाशिक, कोल्हापूर, नांदेड, परभणी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये हजेरी लावली.


राज्यात बुधवारी मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला होता. आज गारा नसल्या तरी सोसाट्याचा वारा मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या. कोल्हापुरातील किनी टोल नाक्यावरील नागरिकांची तपासणी करण्यासाठी उभारलेले शेडचे पत्रे उडून गेले. शेडमधील लॅपटॉप आणि इतर साधन सामुग्री पावसात खराब झाल्याने मोठे नुकसान झाले. कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करताना याठिकाणी नागरिकांची तपासणी केली जात होती. नांदेडमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू तर तीनजण जखमी झाले. हिमायतनगर तालुक्यातील वारंगटाकळी गावात ही घटना घडली. शेतात काम करत असताना वीज पडून 27 वर्षीय कपिल कदमचा मृत्यू झाला.


नाशिक जिल्ह्यात आज संध्याकाळच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. येवला तालुक्यातील पुरणगाव येथील माजी सरपंच पुंडलिक वरे यांच्या शेतातील घरासमोर असलेल्या नारळाच्या झाडावर वीज पडल्याने झाडाला आग लागली. झाडाला आग लागल्याने त्याच्या ज्वाला खाली पडू लागल्या. झाडाखाली कांद्याच्या गोण्या ठेवण्यात आल्या होत्या. त्या वेळीच बाजुला करण्यात आल्याने वरे यांचे होणारे नुकसान त्यामुळे टळले. दरम्यान, पुरणगाव येथे वीज पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला.


मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा!


मागच्या आठवड्यापासून मराठवाड्यात सतत कुठे ना कुठे अवकाळी पाऊस पडतोय. आज परभणीच्या गंगाखेड, पालम तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांनी जमा केलेला कापूस आणि अन्य काही शेतमालाचे नुकसान झाले आहे. शिवाय आंबा, मोसंबी, चिकु आदी फळबागांना ही याचा मोठा फटका बसला. जनावरांचा चाराही मोठ्या प्रमामावर भिजल्याने चाऱ्याचा प्रश्न ही उद्भवू शकतो. तसेच अनेक गावांमधील घरावरील पत्रे ही उडून गेले आहेत.


सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बोली, सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळमध्ये अवकाळी पाऊस सलग तिसऱ्या दिवशी सुरू आहे. आज वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. सावंतवाडी, कुडाळ तालुक्यात ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने सगळ्यांचीच तारांबळ उडाली. भुईबावडा परिसरात अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना सुखद धक्का दिला आहे.


पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये आज पावसाने जोरदार हजेरी लावली. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांना पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसाने अनेक भागातील वीज गेली. पिपरी चिंचवड शहरात तर हा पाऊस सलग तासभर सुरुच होता. अनेक भागात रस्त्यावरुन पाणी वाहले.


Pune Heavy Rain | पुण्यात मुसळधार पाऊस, अवकाळी पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात