Excise policy case : दिल्ली सरकारचं नवीन नवं मद्य धोरण चांगलेच अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सकाळी सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरी छापा मारला होता. दहा तासानंतरही सीबीआय सिसोदिया यांच्या घरी तपास करत आहे. सीबीआयने याबाबात माहिती जारी केली आहे, त्यानुसार दिल्ली सरकारच्या नव्या मद्य धोरणांचा तपास करताना देशभरात 31 ठिकाणी छापेमारी केली आहे. यामध्ये त्यांना अनेक पुरावे मिळाले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनं सीबीआयच्या हवाल्यानं याबाबतची माहिती दिली आहे.


देशभरात आज 31 विविध ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये दिल्ली, मुंबई, गुरुग्राम, चंदीगढ, हैदराबाद, लखनौ आणि बेंगळुरुसह इतर ठिकाणाचा समावेश आहे. या छापेमारीमध्ये अनेक कागदपत्रे, डिजिटलर रेकॉर्ड आणि इतर अनेक गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरु आहे, अशी माहिती सीबीआयने दिली आहे. 




मनीष सिसोदिया आरोपी नंबर 1, CBI ची 15 आरोपींची यादी!
दिल्लीतील मद्य धोरणाविरोधात सीबीआयनं 15 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. सीबीआय अधिकाऱ्यानं याबाबतची माहिती दिली आहे. सीबीआयनं दाखल केलेल्या एएफआयरमध्ये काही दारु कंपन्यांचाही समावेश आहे. त्यासोबत 15 जणांविरोधात आणि काही अज्ञात लोकांविरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केलाय. सीबीआयच्या मते, मनीष सिसोदिया यांच्यावर गुन्हेगारी कट आणि खात्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. 


सिसोदिया काय म्हणाले?
 सीबीआयच्या छापेमारीनंतर मनीष सिसोदिया यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "आम्ही सीबीआयचे स्वागत करतो. तपासात पूर्ण सहकार्य करु जेणेकरुन सत्य लवकर समोर येईल. आतापर्यंत माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत, मात्र काहीही निष्पन्न झालेलं नाही. त्यातूनही काहीही निष्पन्न होणार नाही. देशात चांगल्या शिक्षणासाठी माझं काम थांबवता येणार नाही." दिल्लीच्या शिक्षण आणि आरोग्याच्या उत्कृष्ट कामामुळे हे लोक त्रस्त आहेत. त्यामुळेच शिक्षण, आरोग्याचे चांगले काम बंद पडाव, म्हणून दिल्लीचे आरोग्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. आमच्या दोघांवर खोटे आरोप आहेत. न्यायालयात सत्य बाहेर येईल, असेही ते म्हणाले. 


भाजपचं प्रत्युत्तर -
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी दिल्ली सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. ते म्हणाले की, सीबीआय तपासाच्या भीतीने अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाशी जोडण्यास भाग पाडलेय. पण ही सीबीआय छापेमारी शिक्षणाच्या बाबतीत नव्हे तर एक्साईज पॉलिसीसंदर्भात आहे. एक्साईज पॉलिसीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराने केजरीवाल सरकारचा खरा चेहरा समोर आलाय. 


केजरीवाल काय म्हणाले?
सीबीआयच्या छापेमारीनंतर मुख्यमंत्री आणि आप प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. केजरीवाल म्हणाले की, कोणतीही छापेमारी देशातील नागरिकांसाठी चांगलं काम करण्यास थांबवू शकत नाही. आमच्या चांगल्या कामामध्ये अनेक अडचणी येणार आहेत. याची आम्हाला कल्पना आहे. याआधीही अनेकवेळा छापेमारी झाली आहे. पण त्यामधून काहीही निघालं नाही. यावेळीही त्यांना काहीही मिळणार नाही. आम्ही सीबीआयला सहकार्य करु. 


महत्वाच्या बातम्या :


CBI Raids: सिसोदिया यांच्या घरी 9 तासांपासून सीबीआयचा तपास सुरु, AAP चा भाजपवर आरोप, भाजपचं प्रत्युत्तर, महत्वाचे 10 मुद्दे
Arvind Kejriwal : दिल्लीच्या शिक्षण मॉडेलची जगभर असलेली चर्चा थांबवण्यासाठी सिसोदिया यांच्या घरावर छापे : अरविंद केजरीवाल