CBI Raid at Sisodia's House : दिल्लीतील एक्साईज पॉलिसीमध्ये (Delhi Excise Policy) भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सीबीआयने (CBI) शुक्रवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या घरी छापा मारला. 9 तासांपासून सीबीआय पथक मनीष सिसोदिया यांच्या घरी तपास करत आहे. या छापेमारीवरुन आम आदमी पार्टीने (AAP) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करुन पक्षाला बदनाम करण्याचा आरोप केलाय आहे. तर भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे... सकाळपासून राजधानी दिल्लीमधील सीबीआयच्या छापेमारीसंदर्भात घडलेल्या घडामोडी पाहूयात...  


1. सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या दिल्लीमधील घरी आणि सात राज्यात 20 अन्य ठिकाणी छापेमारी केली. जवळपास 9 तासांपासून सीबीआयचा तपास सुरु आहे. दिल्ली सरकारच्या एक्साईज पॉलिसीच्या विरोधात तपास करण्याची शिफारस नायब राज्यपालांनी केली होती. 
 
 2. तपास यंत्रणांनी नोव्हेंबरमध्ये याबाबत गुन्हा नोंदवत तपास सुरु केला होता. एफआयआरमध्ये उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह अन्य चार जणांच्या नावांचा समावेश आहे. एक्साईज पॉलिसीनुसार दारू दुकानाचे परवाने खासगी व्यापाऱ्यांना देण्यात आले.


3. सीबीआयच्या छापेमारीनंतर मनीष सिसोदिया यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "आम्ही सीबीआयचे स्वागत करतो. तपासात पूर्ण सहकार्य करु जेणेकरुन सत्य लवकर समोर येईल. आतापर्यंत माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत, मात्र काहीही निष्पन्न झालेलं नाही. त्यातूनही काहीही निष्पन्न होणार नाही. देशात चांगल्या शिक्षणासाठी माझं काम थांबवता येणार नाही." दिल्लीच्या शिक्षण आणि आरोग्याच्या उत्कृष्ट कामामुळे हे लोक त्रस्त आहेत. त्यामुळेच शिक्षण, आरोग्याचे चांगले काम बंद पडाव, म्हणून दिल्लीचे आरोग्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. आमच्या दोघांवर खोटे आरोप आहेत. न्यायालयात सत्य बाहेर येईल, असेही ते म्हणाले. 


4. सीबीआयच्या छापेमारीनंतर मुख्यमंत्री आणि आप प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. केजरीवाल म्हणाले की, कोणतीही छापेमारी देशातील नागरिकांसाठी चांगलं काम करण्यास थांबवू शकत नाही. आमच्या चांगल्या कामामध्ये अनेक अडचणी येणार आहेत. याची आम्हाला कल्पना आहे. याआधीही अनेकवेळा छापेमारी झाली आहे. पण त्यामधून काहीही निघालं नाही. यावेळीही त्यांना काहीही मिळणार नाही. आम्ही सीबीआयला सहकार्य करु. 
 
5. छापेमारीनंतर आप पक्षाने भाजपवर निशाणा साधला. भाजप राजकीय षडयंत्र करत आमच्या मंत्र्यांवर अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केलाय. दिल्लीच्या शिक्षण धोरणाचं कौतुक होत असताना आणि अमेरिकेतील सर्वात मोठं वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्समध्ये मनीष सिसोदिया यांचा फोटो आला आहे, तेव्हाच केंद्राने मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयला पाठवलं आहे, असं केजरीवाल यांनी ट्वीट केलेय.  


6. लोकांचं समर्थन आणि अरविंद केजरीवाल यांची वाढती लोकप्रियता पाहून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले आहेत, असे आपचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा म्हणाले. त्यांनी आपल्या लोकांच्या आणि नेत्यांच्या मागे सीबीआय आणि अन्य केंद्रीय तपास यंत्रणा लावली आहे. केजरीवाल यांना संपवणे, हेच त्यांचं ध्येय आहे, असेही चड्ढा म्हणाले. 


7. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी दिल्ली सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. ते म्हणाले की, सीबीआय तपासाच्या भीतीने अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाशी जोडण्यास भाग पाडलेय. पण ही सीबीआय छापेमारी शिक्षणाच्या बाबतीत नव्हे तर एक्साईज पॉलिसीसंदर्भात आहे. एक्साईज पॉलिसीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराने केजरीवाल सरकारचा खरा चेहरा समोर आलाय. 


 8. माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. गंभीर म्हणाले की, दारु आरोग्यासाठी आणि आत्म्यासाठी हानिकारक आहे. दारू ही शरीर आणि आत्मा दोन्ही नष्ट करते, असे महात्मा गांधी म्हणाले होते.  


9. विरोधीपक्षातील नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर केला जातोय. त्यांमुळे तपास यंत्रणावरील विश्वास कमी होत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी दिली आहे. 


 10 . आता दोन विकेट पडल्या आहेत लवकरच तिसरी विकेटही पडेल, असे भाजप नेता कपिल मिश्रा म्हणाले. सत्येंद्र जैन, मनीष सिसोदिया आणि अरविंद केजरीवाल सर्वजण भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जातील, हे मागील पाच वर्षांपासून सांगत आहे.