Arvind Kejriwal : दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या घरी सीबीआयने (CBI) छापा टाकला आहे. सीबीआयचे पथक घरी पोहोचल्याची माहिती सिसोदिया यांनी ट्वीट करुन दिली आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संपूर्ण जग दिल्लीच्या शिक्षण आणि आरोग्य मॉडेलची चर्चा करत आहे. मात्र, हे काहींना थांबवायचे आहे. म्हणूनच दिल्लीच्या आरोग्य आणि शिक्षण मंत्री सिसोदिया यांच्या घरावर छापे टाकल्याचे केजरीवाल म्हणाले. मात्र, दिल्लीत सुरु असलेली चांगली कामे थांबवणार नसल्याचेही ते म्हणाले. 


ज्यांनी चांगले काम केलं त्यांना रोखण्याचा प्रयत्न 


मनिष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयने छापा टाकल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या 75 वर्षात ज्यांनी ज्यांनी चांगले काम करण्याचा प्रयत्न केला त्याला रोखण्यात आल्याचे केजरीवाल म्हणाले. त्यामुळेच भारत मागे राहिल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. दरम्यान, ज्या दिवशी दिल्लीच्या शिक्षण मॉडेलचे कौतुक झाले आणि मनीष सिसोदियांचा फोटो अमेरिकेतील सर्वात मोठे वृत्तपत्र असलेल्या न्यूयॉर्क टाईम्समध्ये पहिल्या पानावर आला, त्याच दिवशी सिसोदिया यांच्या घरावर केंद्र सरकारनं सीबीआयला पाठवल्याचे केजरीवाल म्हणाले. CBI चे आम्ही स्वागत करतो. त्यांना आम्ही पूर्ण सहकार्य करणार असल्याचे केजरीवाल म्हणाले.  यापूर्वीही अनेकवेळा छापे टाकण्यात आले आहेत. मात्र, त्यातून काहीच बाहेर आले नाही. आताही काही बाहेर येणार नसल्याचे केजरीवाल यांनी सांगितलं.


सीबीआयच्या छाप्याबद्दलची माहिती स्वत: मनिष सिसोदिया यांनी ट्वीट करुन दिली आहे. सीबीआय आली आहे. त्यांचे स्वागत आहे. आम्ही अत्यंत प्रामाणिक आहोत. आम्ही लाखो मुलांचे भविष्य घडवत आहोत. आपल्या देशात चांगले काम करणार्‍यांचा अशा प्रकारे छळ होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळेच आपला देश अजून पहिल्या क्रमांकाचा बनलेला नाही, असं सिसोदिया यांनी म्हटलं आहे. आम्ही सीबीआयचे स्वागत करतो. तपासात पूर्ण सहकार्य करु जेणेकरुन सत्य लवकर समोर येईल. आतापर्यंत माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत, मात्र काहीही निष्पन्न झालेलं नाही. त्यातूनही काहीही निष्पन्न होणार नाही. देशात चांगल्या शिक्षणासाठी माझं काम थांबवता येणार नसल्याचे सिसोदिया यांनी म्हटलं आहे.


दिल्लीच्या शिक्षण आणि आरोग्याच्या उत्कृष्ट कामामुळे हे लोक त्रस्त आहेत. त्यामुळेच शिक्षण, आरोग्याचे चांगले काम बंद पडाव, आमच्यावर  खोटे आरोप केले जात आहेत. न्यायालयात सत्य बाहेर येईल असेही सिसोदिया म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या: