नवी दिल्ली : भविष्यात कदाचित तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातून केवळ 60 टक्केच रक्कम काढता येऊ शकते. ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने हा प्रस्ताव दिला आहे. 26 जून रोजी होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय होऊ शकतो. नोकरी गमावलेल्या किंवा बेरोजगारांनाही हा नियम लागू होण्याची शक्यता आहे.
नव्या निर्णयामागचं कारण काय?
ईपीएफओ खात्यातून खातेधारक मोठ्या प्रमाणात निधी काढत आहेत. त्यामुळे संघटनेच्या निधीमध्ये कपात होण्याची चिंता सतावत आहे. याशिवाय नोकरी गमावल्यानंतर किंवा बेरोजगार असताना खातेधारक संपूर्ण रक्कम काढू शकणार नाही, याच्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.
सध्याच्या नियमानुसार, नोकरी सोडल्यानंतर किंवा बेरोजगार असताना दोन महिन्यांनंतर पीएफ खातेधारक संपूर्ण रक्कम काढू शकतो. मात्र ईपीएफओचा प्रस्ताव मान्य झाल्यास या काळातही कर्मचाऱ्यांना आपल्या एकूण जमा रकमेपैकी केवळ 60 टक्केच रक्कम काढता येईल.
पीएफ खातेधारकाला सध्या मुलांचं लग्न, घर बांधणी किंवा आजाराच्या खर्चासाठी पीएफ खात्यातून रक्कम काढण्याची तरतूद आहे. मात्र ईपीएफओच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर कदाचित कर्मचाऱ्यांना 60 टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही.
दरम्यान, ईपीएफओचा हा प्रस्ताव मंजूर होणं एवढं सोपं नाही आणि या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध होण्याचीही शक्यता आहे.
ईपीएफओ नवी तरतूद कशामुळे करणार?
कर्मचारी सध्या नोकरी गेल्यानंतर एका महिन्यानंतर आपल्या पीएफ खात्यातील गेल्या तीन महिन्याच्या पगाराएवढी रक्कम काढू शकतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून कर्मचारी पीएफ खात्यातून आपली सर्व रक्कम काढत असल्याचं सध्या चित्र आहे, ज्यामुळे त्यांना पेंशनचा फायदा मिळत नाही. हा ट्रेंड संपवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी नवा नियम करण्याच्या प्रयत्नात आहे.
पीएफ खातेधारकांना फायदा काय?
पीएफ खात्यात 40 टक्के रक्कम शिल्लक असेल, तर खातेधारकाला भविष्यात गरज पडल्यास ती रक्कम कामी येईल. याशिवाय हा निधी पुढे निवृत्ती निधी म्हणून वापरला जाऊ शकतो.