लखनौ : उत्तर प्रदेशातील एका पोलिस शिपायाने सुट्टीसाठी केलेल्या अर्जाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचं कारणही अतिशय इंटरेस्टिंग आहे. सुट्टी मंजूर करण्यासाठी पोलिस महाशयांनी लिहिलेलं कारणच तितकं रंजक आहे.


सोम सिंह हे उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात कोतवाली पोलिस ठाण्यात तैनात आहेत. 23 जूनपासून सुट्टीवर जाण्यासाठी त्यांनी ठाणेदाराकडे अर्ज केला. सुट्टीचं कारण या रकान्यात त्यांनी लिहिलं 'कुटुंबाच्या विस्तारासाठी'!

आश्चर्याची गोष्ट म्हणजे ठाणेदारानेही 30 दिवसांऐवजी 45 दिवसांची सुट्टी मंजूर केली आहे. या चिठ्ठीचा फोटो सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाला. याची खबर लखनौमधील डीजीपींच्या कार्यालयापर्यंतही पोहचली.



याची खिल्ली उडवली जाऊ नये म्हणून सोम सिंहांना पुन्हा अर्ज करण्यास सांगितलं गेलं. महोबाचे एसपी एन कोलांची यांनी सोम सिंह यांना बोलावून सुट्टीसाठी वेगळं कारण लिहिण्यास सांगितलं. त्यानंतर सुट्टी मंजूर करण्यात आली.

सोम सिंह फतेहपूरचे रहिवासी आहेत. गेल्या अनेक आठवड्यांपासून ते सुट्टीची मागणी करत होते.

गेल्या महिन्यात लखनौमधील धर्मेंद्र सिंह यांनीही दहा दिवस सुट्टी मागितली होती. सुट्टी मिळाली नाही, तर बायको सोडून जाईल, असं कारण धर्मेंद्रंनी लिहिलं होतं.

पोलिस कर्मचाऱ्यांना सु्ट्टी मिळणं कायमच कठीण असतं. उत्तर प्रदेशातील पोलिस कर्मचाऱ्यांना तर वीकली ऑफही मिळत नाही. भरीस भर म्हणजे प्रत्येक पोलिसाला 12 ते 16 तासांपर्यंत ड्युटी करावी लागते.